गणेशांचा योग्य सन्मान; विधानसभा सभापतिपदी निवड अन् कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:06 IST2025-09-26T13:04:38+5:302025-09-26T13:06:19+5:30

गोव्याचे खरे भूमिपुत्र म्हणजे एसटी समाज. अनुसूचित जमातींमधील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गणेश गावकर पुढे आले. 

ganesh gaonkar elected as speaker of the goa legislative assembly | गणेशांचा योग्य सन्मान; विधानसभा सभापतिपदी निवड अन् कारकीर्द

गणेशांचा योग्य सन्मान; विधानसभा सभापतिपदी निवड अन् कारकीर्द

गोवा विधानसभेचे सभापतिपद हे अत्यंत मानाचे व प्रतिष्ठेचे पद आहेच. यापूर्वी काही सभापतींनी ही प्रतिष्ठा वाढवली, तर काहींच्या कृतीमुळे प्रतिष्ठा धोक्यातही आली. गणेश गावकर यांची काल सभापतिपदी निवड झाली. आयुष्यात प्रथमच त्यांना सभापतिपद मिळाले आहे. सावर्डे मतदारसंघातून दोनवेळा निवडून आलेल्या गणेश गावकर यांना कधीच मंत्रिपद मिळालेले नाही; पण सभापतिपद मात्र यावेळी प्राप्त झाले. पूर्वी डिचोलीहून निवडून येणाऱ्या राजेश पाटणेकर यांनादेखील कधी मंत्रिपद मिळाले नव्हते; मात्र सभापतिपद मिळाले होते. गणेश गावकर यांची पार्श्वभूमी वेगळी आहे. गोव्याचे खरे भूमिपुत्र म्हणजे एसटी समाज. अनुसूचित जमातींमधील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गणेश गावकर पुढे आले. 

गेली काही वर्षे ते शांतपणे भाजपचे काम करत राहिले. सावर्डे मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. मध्यंतरी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानेही ते खचले नाहीत. काम करत राहिले. पुन्हा वर्ष २०२२ मध्ये विधानसभेत पोहोचले आणि आता सभापती झाले. अनेक वर्षांपूर्वी खनिज खाणीवर काम करण्याचा अनुभव त्यांनी घेतला. नंतर स्वतःच खाण धंद्यात उतरले. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर राजकारणात आले; मात्र गणेश गावकर यांनी राजकीय क्षेत्रात वावरताना आपल्याला कोणताही डाग लागू दिला नाही. कष्टकरी समाजातून व श्रमजीवी वर्गातून आलेला हा अस्सल ग्रामीण शैली असलेला माणूस सभापतिपदापर्यंत पोहोचला आहे. हा त्या कष्टांचा गौरव आहे. संपूर्ण श्रमजीवी वर्गाच्या घामाचा हा सन्मान आहे, असे म्हणावे लागेल. 

सभापतिपद पूर्वी विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, माजी मंत्री दयानंद नार्वेकर, आताचे मंत्री रमेश तवडकर, माजी आमदार तोमाझिन कार्दोज, शेख हसन हरून, राजेंद्र आर्लेकर, विश्वास सतरकर आदी अनेकांनी भूषविले आहे. स्वर्गीय पां. पु. शिरोडकर हे मुक्त गोव्याचे पहिले विधानसभा सभापती होते. गणेश गावकर यांना या खुर्चीवर बसण्याचा मान मिळाला आहे. गावकर हे पदाला न्याय देतील, असा विश्वास ठेवता येतो. सत्ताधारी व विरोधी आमदार अशा दोन्ही बाजूंच्या लोकप्रतिनिधींना समान वेळ आणि संधी देत सभागृहाचे कामकाज पुढे न्यायचे असते. सभापतींसाठी सर्व ३९ सदस्य हे समान असतात. त्यांनी पक्षपात करायचा नसतो. सभागृहाच्या नीती-नियमांची जाण सभापतींना असावी लागते. अर्थात अनुभवातून ते ज्ञान प्राप्त होतच असते. 

गणेश गावकर हे तर अभ्यासू आहेत. सभागृहाचे सदस्य म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे, अनुभवले आहे. प्रत्यक्ष त्यात भाग घेतला आहे. आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मांडून मंत्र्यांकडून उत्तरे घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो. काहीवेळा अपमान व अवहेलनाही सहन करावी लागते. गणेश गावकर यांना हे ठाऊक आहेच. त्यामुळेच ते सभापतिपदाच्या खुर्चीवर बसून सर्वांना समान वागणूक देतील, अशी आशा ठेवता येते. गावकर हे चांगले वाचक आहेत व कायद्याचा अभ्यास करणारे जागृत लोकप्रतिनिधीही आहेत. गरीब लोकांच्या व्यथा, वेदना त्यांना कळतात. वास्तविक त्यांना सभापती म्हणून खूप पूर्वी संधी मिळायला हवी होती. मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्यासही ते पात्र होते. 

भाजपमध्ये काही आमदार एकमेकांशी भांडत असतात. गणेश गावकर कधीच कोणत्या भांडणात पडले नाहीत. एसटी समाजात त्यांचा जन्म झाला असला, तरी अन्य समाजांच्या प्रश्नांकडेही त्यांनी कायम डोळसपणे पाहिले. भाजपमधील शिस्तीचे त्यांनी सतत पालन केले. तरीही भाजपमधील काहीजण त्यांचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतात, हे दुर्दैवी आहे. गणेश म्हणजे गोविंद गावडे नव्हेत. गणेश म्हणजे रमेश तवडकरही नव्हेत. तोंड बंद ठेवून आपले काम करत राहणे हा गणेश गावकर यांचा गुण आहे. उगाच मायकल लोबोंप्रमाणे सर्वच विषयांवर बोलत राहून वादांना निमंत्रण देणे असाही गावकर यांचा स्वभाव नाही. अतिआक्रमक आततायीपणा करून सरकारची व भाजपचीही अडचण करण्याची कृती गावकर यांनी कधी केली नाही. गणेश गावकर यांच्याप्रमाणे थोडे शांतचित्ताने गोविंद गावडे वगैरे पुढे गेले असते तर आजदेखील गावडे मंत्रिपदी कायम राहिले असते आणि तवडकरच सभापतींच्या खुर्चीवर दिसले असते. अर्थात तो विषय वेगळा आहे.

 

Web Title : गणेश गावकर: गोवा विधानसभा अध्यक्ष पद, करियर और सम्मान

Web Summary : गणेश गावकर गोवा विधानसभा अध्यक्ष चुने गए। विनम्र पृष्ठभूमि से, दो बार विधायक रहे, वे ईमानदारी और समर्पण के लिए जाने जाते हैं। उनका चयन मेहनती व्यक्तियों के लिए एक श्रद्धांजलि है और विधानसभा में उनके अनुभव और निष्पक्ष दृष्टिकोण को दर्शाता है।

Web Title : Ganesh Gavkar: Speaker Selection, Career, and Respect in Goa Assembly

Web Summary : Ganesh Gavkar, from a humble background, elected Goa Assembly Speaker. A two-time MLA, he's known for integrity and quiet dedication. His selection is a tribute to hardworking individuals and reflects his experience and fair approach within the Assembly.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.