बोरी पुलाची २०२७ पूर्वी होणार पायाभरणी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 13:06 IST2025-12-13T13:02:26+5:302025-12-13T13:06:41+5:30
'माझे घर'ला विरोध करणाऱ्यांना जाब विचारा : बोरीच्या उमेदवार पूनम सामंत यांच्या प्रचार सभेला संबोधन

बोरी पुलाची २०२७ पूर्वी होणार पायाभरणी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : गोव्याचा विकास हा गेल्या दहा वर्षापासून वेगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीवार्दाने झालेला आहे. २०२७ पूर्वी बोरीच्या नव्या पुलाची पायाभरणी केली जाईल. पुलासाठी भूसंपादनाच्या कामामुळे हे काम थोडे लांबले आहे. नवे पूल उभारल्यानंतर बोरी शिरोडाहून पणजी वास्को हे अंतर काही मिनिटांनीच पार करता येणार आहे. माझे घर ही योजना ज्यांची घरे भाटकारांच्या, जमीनदारांच्या जागेत आहेत, त्यांना सनदा देऊन ती घरे कायदेशीर करण्यात येईल. या लोकोपयोगी योजनेला विरोध करणारे भाजप उमेदवारांच्या विरोधात आपला उमेदवार उभा करून मते मागायला येतील त्यांना जाब विचारा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
देऊळवाडा बोरी येथील राघवेंद्र स्वामी सभागृहात बोरी जिल्हा पंचायत निवडणुकीचे भाजप उमेदवार पूनम सामंत यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. याप्रसंगी जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, आमदार दाजी साळकर, सर्वानंद भगत, जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर, सरपंच सागर बोरकर, बेतोडा सरपंच मधू खांडेपारकर, उमेदवार पूनम सामंत, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी सरपंच जयेश नाईक, मिनानाथ उपाध्ये, शिरोडा भाजप गटाध्यक्ष अक्षय गावकर, बोरी आणि बेतोडा पंचायतीचे पंचसदस्य आदी व्यासपीठावर होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या मोदींजीचा भारत देश आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प असून त्याहेतूने गृहआधार, विमाकार्ड आदी सर्व योजना तयार केल्या आहेत. नारीशक्ती वाढविण्यासाठी ४५ हजार महिलांना ३४० कोटी रू. गेल्या दहा वर्षात उद्योग व्यवसाय करण्यासाठी दिले आहेत. एक लाख महिलांना स्वयंरोजगार उभारण्यासाठी मदत देऊन नारीशक्ती सरकार बनवले जाणार आहे.
विकासात शिरोडा पहिल्या पाचमध्ये येणार
मंत्री शिरोडकर म्हणाले की, शहरी १० मतदार सोडले तर ३० मतदारसंघात विकासाच्या बाबतीत शिरोडा मतदारसंघ पहिल्या दहाच्या यादीत येतो. आता तर तो पहिल्या पाचमध्ये येणार आहे. रस्ते, पाणी, वीज, शिक्षण क्षेत्रात शिरोडा मतदारसंघ पुढे असून लोकांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य चालू आहे.
माझे घर या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या योजनेत राज्यभरातील सर्वसामान्य नागरिकांची मोठी अडचण दूर होणार आहे. बोरी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार बहुसंख्य मताधिक्यांनी निवडून येतील. यावेळी दीपक नाईक बोरकर, नरेंद्र सावईकर, उमेदवार पूनम सामंत यांनीही आपले विचार मांडले. अक्षय गावकर यांनी स्वागत केले. शैलेश बोरकर यांनी सूत्रसंचालन केले. तर जयेश नाईक यांनी आभार मानले.