'फॉर्मुला-४' स्पर्धेमुळे मुरगाव जगाच्या नकाशावर पोहचेल: संकल्प आमोणकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 10:37 IST2025-10-08T10:36:02+5:302025-10-08T10:37:26+5:30
या स्पर्धेमुळे कोणतीही समस्या उद्भवणार नसून काही लोक आयोजनावरून लोकांची दिशाभूल करत आहेत.

'फॉर्मुला-४' स्पर्धेमुळे मुरगाव जगाच्या नकाशावर पोहचेल: संकल्प आमोणकर
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : 'फॉर्मुला-४' हा आंरतराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा इव्हेंट या आहे. स्पर्धेच्या आयोजनामुळे मुरगावचे नाव जागतिक नकाशावर पोहोचणार आहे. या स्पर्धेमुळे कोणतीही समस्या उद्भवणार नसून काही लोक आयोजनावरून लोकांची दिशाभूल करत आहेत. तरीही या स्पर्धेमुळे समस्या निर्माण होईल, असे वाटत असेल तर त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या जनता दरबारमध्ये त्या मांडाव्यात, असे आवाहन आमदार संकल्प आमोणकर यांनी केले.
'फॉर्मुला ४' स्पर्धेचे बोगदा-सडा येथे ३१ ऑक्टोबर, १ व २ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आल्याचेही आमोणकर यांनी सांगितले. ही स्पर्धा जागतिक पातळीवर नावाजलेली आहे. स्पर्धेच्या आयोजनाची देशातील इतर राज्यांनीही तयारी दाखवली होती.
गोव्यात आयोजनासाठी पणजी, बोगदा तसेच अन्य ठिकाणे पाहण्यात आली. यामध्ये नंतर बोगदा येथे आयोजन करण्याचे निश्चित केले. या स्पर्धेच्या आयोजनामुळे बोगदा-सडा भागातील लोकांना कोणताही त्रास होणार नाही, असेही आमोणकर यांनी सांगितले.
फॉर्म्युला-४ स्पर्धेच्या आयोजनाबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. स्थानिकांना कोणताही त्रास होणार नसल्यामुळेच आम्ही या स्पर्धेच्या आयोजनाची तयारी करण्याचे निश्चित केले आहे. लोकांनी अफवा तसेच खोट्या माहितीवर विश्वास ठेऊ नये, असेही आमोणकर म्हणाले.
काही जणांकडून लोकांमध्ये अफवा पसरवण्याचे काम
'फॉर्मुला-४'साठी प्रेक्षकांसह १५ हजारांच्या आसपास स्पर्धक येणार आहेत. त्यामुळे त्यांचा कोणताही त्रास होणार नाही. मुरगावात ह्या प्रतिष्ठीत स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्यच असल्याचेही आमोणकर म्हणाले. स्पर्धेच्या आयोजनासाठी मंदिरांची कुंपणे, स्मशानभूमीचेही कुंपण तोडले जाईल, लोकांना ये-जा करता येणार नाही, अशा खोट्या अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे, असेही आमोणकर म्हणाले.