माजी उपसभापती अन् ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वाघ यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 22:19 IST2019-02-13T21:56:37+5:302019-02-13T22:19:51+5:30
वाघ हे 2012 सालच्या विधानसभा निवडणुकीत सांतआंद्रेमधून निवडून येऊन प्रथमच गोवा विधानसभेचे सदस्य बनले होते. उपसभापतीपदी असताना वाघ यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.

माजी उपसभापती अन् ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वाघ यांचे निधन
पणजी : ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी उपसभापती विष्णू वाघ यांचे 8 फेब्रुवारी रोजी निधन झाल्याचे वाघ यांच्या पत्नी अरुणा वाघ यांनी बुधवारी रात्री दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमधून जाहीर केले. वाघ हे गेल्या 2.5 वर्षांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी व कोंकणी साहित्यिक विश्वाला व राजकीय क्षेत्रालाही धक्का बसला आहे. मृत्यूसमयी वाघ यांचे वय 55 वर्षे होते.
वाघ हे 2012 सालच्या विधानसभा निवडणुकीत सांतआंद्रेमधून निवडून येऊन प्रथमच गोवा विधानसभेचे सदस्य बनले होते. उपसभापतीपदी असताना वाघ यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यामुळे, अर्धागवायूचा झटका आल्यानंतर होते तसे त्यांचे शरीर झाले होते. त्यावेळपासून ते व्हिलचेअरला खिळून होते. वाघ यांच्या पत्नी अरुणा वाघ यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, दोन महिने वाघ हे दोनापावल येथील मणिपाल इस्पितळात होते. ते वारंवार आजारी होऊ लागल्याने त्यांच्याच इच्छेनुसार केपटाऊन, जोहान्सबर्ग येथे त्यांना आपण नेले होते. तिथे त्यांना आराम मिळाला होता; पण 8 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. येत्या दोन दिवसांत त्यांचा मृतदेह गोव्यात आणून अंत्यसंस्कार केले जातील.