वन खाते अधिक सक्रिय व वेगवान; मंत्री विश्वजीत राणे यांनी अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 08:26 IST2025-09-05T08:25:38+5:302025-09-05T08:26:00+5:30
दिवसभर चालली बैठक, निधीच्या विनियोगावर चर्चा

वन खाते अधिक सक्रिय व वेगवान; मंत्री विश्वजीत राणे यांनी अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : वन खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांची गुरुवारी पणजीतील एका हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली. वन मंत्री विश्वजीत राणे यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत वन खाते अधिक सक्रिय करणे, वन खात्याशी संबंधित कामे जलदगतीने निकालात काढणे यावर चर्चा झाली.
वन खात्याची पूर्ण दिवसाची अशा प्रकारची ही पहिलीच बैठक ठरली. पूर्वी आरोग्य खात्याच्या सल्लागार समितीच्या वगैरे अशा बैठका व्हायच्या.
वन अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्री राणे यांनी आपले विचार मांडले. लोकांशी संबंधित कामे जलदगतीने वन खात्याने करायला हवीत, काही प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी किंवा अर्ज फेटाळण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते ती जलदगतीने व्हायला हवी, अशी सरकारची भूमिका आहे. जंगलात राहणारे लोक आणि वन खाते यांच्यात संघर्ष होऊ नये म्हणूनही मंत्री राणे यांनी काही सूचना केल्या. वन खात्यातर्फे अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. कोणते काम आतापर्यंत केले आणि निधीचा विनियोग कसा केला जातो यावर चर्चा झत्तली.
चरावणे धरणाविषयी वनमंत्र्यांची चर्चा
दरम्यान, आणखी एक बैठक स्वतंत्रपणे चरावणे धरणाविषयी झाली. यामध्ये चरवणे-सत्तरी येथे एमआय टैंक प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली. यावेळी वन खात्यासह जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत वनमंत्री विश्वजीत राणे यांनी ही चर्चा केली. या प्रकल्पाद्वारे स्थानिक लोकांना पाणी मिळणार असून जंगल, वन्यजीव व पर्यावरणाचे रक्षण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. या प्राथमिक बैठकीनंतर सविस्तर कार्य योजना अंतिम केली जाणार आहे. या चर्चेत पाणी व्यवस्था, बाधित कुटुंबांचे पुनर्वसन, वृक्षारोपण तसेच पर्यावरणीय संरक्षणाचे उपाय यावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे वनमंत्री विश्वजीत राणे म्हणाले.
टँक प्रकल्प महत्त्वाचा
विकास हा पर्यावरण संरक्षणासोबत चालला पाहिजे, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला. लोकांना प्रत्यक्ष लाभपोहोचविण्याबरोबरच राज्याची नैसर्गिक संपदा, वारसा आणि पर्यावरणीय संतुलन जपण्यास प्राधान्य देण्यात येईल, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली. एमआय टँक प्रकल्प सत्तरीतील जलस्रोतांची उपलब्धता वाढवून शेतकरी, स्थानिक नागरिक तसेच संपूर्ण परिसंस्थेला महत्त्वपूर्ण हातभार लावणार आहे.