वाळू उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार; सात संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 07:36 IST2025-10-29T07:35:40+5:302025-10-29T07:36:09+5:30
वाळू व्यवसायाच्या वर्चस्ववादातून प्रकार घडल्याचा संशय

वाळू उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार; सात संशयित ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे/पणजी : तालुक्यात पोरस्कडे-उगवे गावच्या सीमारेषेवर तेरेखोल नदीकिनारी वाळू व्यवसायाशी संबंधित असलेल्या रामऋषी पासवान आणि लाल बहादूर गोड या दोन बिहारी कामगारांवर मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता गोळीबार करण्यात आला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या बांबोळी येथे गोमेकॉत उपचार सुरू आहेत. या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, रात्री उशीरा याप्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पेडणेचे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांची टीम गोळीबार नक्की कोणी केला? तो का केला? त्याचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम १०९ बीएनएस आणि ३ आर/डब्ल्यू २५ या कलमाखाली संशयितांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. गोळीबार झालेल्या बिहारमधील कामगारांपैकी एकाच्या हातातून तर दुसऱ्याच्या मानेतून गोळी आरपार गेल्याची घटना घडलेली आहे.
गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ही घटना नेमकी कशी घडली? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. घटनास्थळी पडताळणी करण्यात आली. गोळीबार नक्की कशासाठी झाला आणि कोणी केला हे अजून स्पष्ट झालेले नाही.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेसुमार वाळू उत्खनन करण्यावर बंदी घातली आहे. मात्र परप्रांतीय मजुरांचा आधार घेऊन राज्यातील सरकारी मालमत्तेवर डल्ला मारला जातो. काही ठिकाणी बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांशी प्रशासनाची मिलीभगत असल्याचा आरोप केला जातो.
दरम्यान, उगवें येथील वाळू उपसा कामगारांवर झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. भाजप राजवटीत कायदा-सुव्यवस्थेचा पूर्णपणे सत्यानाश झाल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. ते म्हणाले की, या सरकारच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा ऱ्हास झाला असल्याची ही उदाहरणे आहेत.
दोन गटांत गोळीबार ?
हा गोळीबार दोन गटात झाला असावा का? असा संशय स्थानिक नागरिकांना आहे. त्या दृष्टिकोनातून तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिली.
असा घडला प्रकार
घटनास्थळी व सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोरस्कडे येथील वाळू व्यवसायाशी संबंधित असलेला एक गट रेती काढण्यासाठी आला होता. त्यांच्यापैकी आठ जण होडीत बसले होते. वाळू काढण्यासाठी जात असताना दुसऱ्या गटाकडून या दोन कामगारांवर गोळी झाडण्यात आली.
यातील दोघे गंभीर जखमी झाले. गोळीबाराच्या प्रकाराने सर्वजण घाबरले. एका खासगी वाहनातून दोघांना बांबोळी येथे गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. यापैकी एका जखमीवर शस्रक्रिया करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गुन्हेशाखा व जिल्हा पोलिसांचा संयुक्त तपास
पोरस्कडे येथे झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा आणि जिल्हा पोलिस एकत्रितपणे करीत आहेत. पोरस्कडे येथे नुकत्याच झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखा आणि जिल्हा पोलिसांनी एकत्रितपणे तपास चालविला असल्याची माहिती उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
या प्रकरणात विशेष पुरावे सापडल्याचा दावाही गुप्ता यांनी केला आहे. पोलिसांनी गोळीबारामागील हेतूचाही छडा लावला आहे. त्यानुसार तपास चालविला आहे. जखमींपैकी एकाची गोळी काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, तर दुसऱ्याच्या मानेला दुखापत झाली आहे. ही घटना बेकायदेशीर वाळू उपशांशी संबंधित असेल तर जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे गुप्ता यांनी सांगितले.
नोंदणी आहे का?
वाळू व्यवसायाशी संबंधित मजुरांशी नोंदणी पेडणे पोलिसांकडे आहे का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते उदय महाले यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, यापूर्वीही कामगारांवर हल्ले होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. परंतु पोलिसांकडून त्यांना अभय मिळाल्याने कायदा सुव्यवस्थेची भीतीच उरलेली नाही.
गोवा 'टोळ्यांचे राज्य' बनवू नका : युरी
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, गोवा 'टोळ्यांचे राज्य' बनू नये. गोव्यात बेकायदेशीरपणे बंदुका घेऊन फिरणे ही एक प्रवृत्ती बनली आहे का हे सरकारने तपासावे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांमध्ये पोलिसांची भीती राहिलेली नाही. सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आणि गुन्हे रोखण्यात अपयशी ठरले आहे. गोवा कोणासाठीही सुरक्षित नाही.
कठोर कारवाई होईल : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पोरस्कडेतील गोळीबाराच्या घटनेसंदर्भात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. प्रसारमाध्यमांशी बोलताना सावंत म्हणाले की, गोळीबारात सहभागी असलेल्यांची ओळख पटवून त्यांना तुरुंगात टाकले जाईल. पोलिसांना सखोल चौकशीचे, परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हा बेकायदा वाळू उपशाचा पुरावा : क्लॉड आल्वारिस
या घटनेवर प्रतिक्रिया देताना गोवा फाउंडेशनचे संस्थापक क्लॉड आल्वारिस म्हणाले की, बेकायदा वाळू उपशासंबंधी आमच्या तीन अवमान याचिका कोर्टात आहेत. उगवे येथील घटनेने पुन्हा एकदा सिध्द झाले की बेकायदा वाळू उपसा राज्यात सुरु आहे. निदान पोलिसांना तरी आता याबद्दल सबळ पुरावा मिळाला आहे. पोलिस काही करत नाहीत कारण त्यांचे वाळू माफियांना आशीर्वाद आहेत.