पराभवाच्या भीतीने लोकशाहीचा खून; पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर केतन भाटीकरांची भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 07:12 IST2026-04-09T07:10:00+5:302026-04-09T07:12:47+5:30
सरकारची नामुष्की उघड.

पराभवाच्या भीतीने लोकशाहीचा खून; पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर केतन भाटीकरांची भाजपावर टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे फोंडा विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निवाडा देण्यात आला. कार्यकर्त्यांनी १५ दिवस प्रचार केला, कष्ट घेतले. त्यांनी जो वेळ, आर्थिक खर्च केला, तो कोण परत देणार, असे प्रश्न काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांनी केलेत. जो निवाडा आला आहे, त्यावरून केंद्र व राज्य सरकारची नामुष्की उघड झाली. हा त्यांचा नैतिक पराभव आहे. विविध सर्वेमधून भाजपला आपला पराभव स्पष्ट दिसू लागला होता. त्यांचा पराभव अटळ असल्याचे लक्षात येताच लोकशाहीचा खून करण्यात आला, अशी टीका भाटीकर यांनी केली.
न्यायालयाच्या निकालानंतर भाटीकर यांनी सांगितले, पोटनिवडणूक रद्द होणे म्हणजे लोकशाहीचा खून केल्यासारखे आहे. निवडणूक रद्द व्हावी म्हणून जी याचिका दाखल करण्यात आली होती. ती भाजपच्याच प्रितम हरमलकर यांनी केली होती. विश्वनाथ दळवी यांचे ते खास मित्र असल्याचे त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून समजून येते. जर कायद्यात या संदर्भाची तरतूद करण्यात आली आहे तर निवडणूक आयोगाने वेळीच पावले का उचलली नाहीत. तरतूद करण्यात आलेली मुदत संपण्याची प्रतीक्षा ते का करत राहिले.
'भाजपने ती आश्वासने पूर्ण करावीत'
या निवडणुकीत भाजपने ज्या काही घोषणा केल्या आहेत, त्या त्यांना आता पूर्ण कराव्याच लागतील. हॉस्पिटलला जिल्हा इस्पितळाचा दर्जा न दिल्यास फोंडा बंद आंदोलन करण्यात येईल. स्मार्ट सिटीचे जे स्वप्न दाखवले आहे, त्याचा प्लान मुख्यमंत्र्यांना दाखवावा लागेल. फोंड्यात साडेआठशे युवकांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. आता त्यांनी आपले वचन पूर्ण करावे, असे भाटीकर यांनी सांगितले.
ते अधिवेशन पुन्हा बोलावणार का ? : मनोज परब
फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. मनोज यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'सरकारने पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दिवस कमी करून ते गुंडाळले. आता अधिवेशन पुन्हा पूर्ण क्षमतेने बोलावणार का ? असा प्रश्न त्यांनी केला. केवळ अधिवेशन टाळण्यासाठीच सरकारने या पोटनिवडणुकीचा सोयीस्कर वापर केल्याची टीका त्यांनी केली. गोव्यातील स्थलांतरित मतदारांच्या मुद्द्यावर आयोगाने जशी निष्क्रियता दाखवली, तसेच अपयश या पोटनिवडणुकीच्या बाबतीतही आयोगाला आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आमच्या कार्यकर्त्यांची धास्ती
भाटीकर म्हणाले, की प्रचारादरम्यान आमच्या कार्यकर्त्यांची धास्ती घेतल्यामुळेच संपूर्ण मंत्रिमंडळ व भाजपचे सर्व नेते फोंड्यात प्रचाराला आले. आमच्या कार्यकर्त्यांना फोडण्यासाठी अनेक कूटनीती वापरण्यात आल्या. नगरपालिका व पंचायतीकडून त्यांना नोटिसासुद्धा पाठविण्यात आल्या. मात्र, माझे स्वाभिमानी कार्यकर्ते डगमगले नाहीत. कार्यकर्ते माझ्या पाठीशी ठाम राहिले. भाजपच्या प्रचार सभेत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केलेल्या आरोपांवर भाटीकर म्हणाले की, मी श्रीपादभाऊंचा आदर करतो, मात्र ते चुकीचे बोलले. माझ्यावर केलेले आरोप खरे असल्याचे श्रीपादभाऊंनी श्री देव झरेश्वराच्या मंदिरात येऊन सांगावे.