फोंड्यात रंगतेय 'तुल्यबळ' लढत; पोटनिवडणुकीत भाजप-काँग्रेस यांच्यात रस्सीखेच
By किशोर कुबल | Updated: April 1, 2026 07:11 IST2026-04-01T07:11:13+5:302026-04-01T07:11:13+5:30
दोन्हीकडील नेत्यांची होतेय दमछाक

फोंड्यात रंगतेय 'तुल्यबळ' लढत; पोटनिवडणुकीत भाजप-काँग्रेस यांच्यात रस्सीखेच
किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीत चुरशीची आणि अत्यंत तुल्यबळ लढत रंगत असल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे. स्थानिक वातावरण, प्रचाराची तीव्रता, प्रमुख पक्षांचे मैदानातील अस्तित्व आणि मतदारांचा कल यावरून ही निवडणूक सरळसरळ एकतर्फी नसून शेवटच्या क्षणापर्यंत टोकाची होणार, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. भाजप व काँग्रेस अशा दोन्हीकडील नेते व कार्यकर्त्याची सध्या प्रचार काळात दमछाक होत आहे.
फेब्रुवारी २०२२ मधील विधानसभा निवडणुकीत फोंडा मतदारसंघात मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात झाले होते. त्यावेळीही भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती तरी इतर पक्षांनीही निर्णायक मते घेतली होती. त्यावेळी चार उमेदवार होते. आरजीतर्फे सानिश तिळवे याने निवडणूक लढवली होती. त्याला १,७७० मते मिळाली. परंतु याचा फटका मात्र मगोपचे तत्कालीन उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांना बसला. त्यांना केवळ ७७मतांनी पराभव पत्करावा लागला. आरजीने उमेदवार उभा केला नसता तर कदाचित त्यावेळी चित्र वेगळे दिसले असते. भाजपचे रवी नाईक हे त्यावेळी ७,५१४ (२९.१२ टक्के) मिळवून विजयी ठरले होते. दुसऱ्या क्रमांकावर आलेले डॉ. केतन भाटीकर यांनी त्यावेळी ७,४३७ (२८.८२ टक्के) मते मिळाली. काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार राजेश वेरेकर हे ६,८३९ (२६.५१ टक्के) मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर होते.
आताच्या पोटनिवडणुकीत भाजप, काँग्रेस व आप असे तीनच उमेदवार आहेत. त्यामुळेच यंदाच्या पोटनिवडणुकीत प्रत्येक मताचे महत्त्व वाढले असून लढत अधिकच चुरशीची बनली आहे. भाजपचा आक्रमकपणे प्रचार दिसून येत आहे. पक्षाचे उमेदवार रितेश नाईक्र यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार स्वतः मैदानात उतरले असून बूथ पातळीपर्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
काँग्रेसनेही जोरदार काउंटर मोहीम उघडली आहे. पक्षाचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर अत्यंत सक्रिय आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी फोंड्यात तळ ठोकला असून स्थानिक नेत्यांसह घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आम आदमी पक्षाकडून उमेदवार गीतेश नाईक रिंगणात असले तरी प्रत्यक्ष फिल्डवर त्यांचा प्रभाव मर्यादित असल्याचे दिसते. पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या प्रचारासाठी फोंड्यात दाखल झाल्यामुळे काही प्रमाणात वातावरणनिर्मिती झाली आहे.
तरीही ही लढत त्रिकोणी करण्याइतका आपचा प्रभाव आहे का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीच्या शेवटच्या दोन ते तीन दिवसांत उमेदवारांकडून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न वाढतील, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
दरम्यान, फोंड्यातील मतदारांमध्ये स्थानिक प्रश्नांना मोठे महत्त्व आहे. पायाभूत सुविधा, रोजगार, वाहतूक, पाणीपुरवठा, तसेच विकासकामांची गती हे मुद्दे चर्चेत आहेत. प्रचारसभांपेक्षा प्रत्यक्ष भेटीगाठींना आणि स्थानिक समस्यांच्या निराकरणाच्या आश्वासनांना अधिक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
गोवा फॉरवर्ड आणि आरजी 'नावापुरते'?
गोवा फॉरवर्ड किंवा आरजीने आणि उमेदवार दिलेले नसले तरी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी या पक्षांचे फारसे प्रयत्न दिसत नाहीत. काही ठिकाणी नावापुरती उपस्थिती असली तरी निर्णायक परिणाम घडवेल असा प्रभाव सध्या जाणवत नाही. विरोधी पक्षनेते युरी आलेमांव व गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांच्यात मध्यंतरी मतभेद निर्माण झाले होते. नंतर ते मिटले असे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात ही दरी कायम आहे. गोवा फॉरवर्ड लोकसभा निवडणुकीच्यावेळी दक्षिणेत काँग्रेस उमेदवारासाठी सक्रिय होता तसे फोंड्याच्या बाबतीत तरी दिसत नाही. यावेळी स्वतःचा उमेदवार दिलेला नसल्याने आरजीही नावापुरताच प्रचारात दिसत आहे.
मते विभागण्याची शक्यता
सध्याच्या राजकीय वातावरणावरून तरी भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट आणि तुल्यबळ लढत असल्याचे स्पष्ट दिसते. आपचा प्रभाव मर्यादित असला तरी काही मतांचे विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुल्यबळ लढत असल्याने ही पोटनिवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चित राहणारी आणि निकालाच्या दिवशीच खरे चित्र स्पष्ट करणारी ठरणार आहे.