ईडीचे कॅसिनोंवर छापे; व्यावसायिकांत खळबळ, मनी लॉड्रिंग प्रकरणी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 07:47 IST2025-08-23T07:47:21+5:302025-08-23T07:47:36+5:30
पहाटेपासून सुरू झालेले ईडीच्या अधिकाऱ्यांचे छापासत्र रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

ईडीचे कॅसिनोंवर छापे; व्यावसायिकांत खळबळ, मनी लॉड्रिंग प्रकरणी कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पणजीसह राज्यातील अन्य ठिकाणी असलेल्या सात कॅसिनोंच्या कार्यालयांवर शुक्रवारी छापे टाकले. यावेळी अनेक महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे काल पहाटेपासून सुरू झालेले ईडीच्या अधिकाऱ्यांचे छापासत्र रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
कर्नाटक चित्रदुर्ग येथील काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग, बेकायदेशीर बेटिंग व ऑनलाईन जुगार प्रकरणाच्या तपासाअंतर्गत ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पणजीतील पाटो परिसर, कांदोळी व कळंगुट येथील कॅसिनोंच्या कार्यालयावर ही छापेमारी करण्यात आली. शुक्रवारी पहाटे ५ वाजता पोलिस संरक्षणात या छापेमारीला सुरुवात झाली होती. संध्याकाळी उशिरापर्यंत ही छापेमारी सुरू होती. बंगळुरू येथील ईडीच्या प्रादेशिक कार्यालयाने ही कारवाई केली आहे. या कारवाईसाठी एकूण सात पथके स्थापन करण्यात आली आहेत. शुक्रवारी पहाटे अचानक ईडीचे पथक कॅसिनो कार्यालयांवर धडकल्याने तेथील कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. कारवाई झालेल्या कॅसिनोंमध्ये बहुतेक ऑन शोअर कॅसिनोंचा समावेश आहे.
या कारवाईत काही कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. परंतु त्याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास टाळले. दरम्यान, तब्बल ४१ कोटी रुपयांच्या अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अटक केलेल्या संशयित निबू विंसेंट (कोलकता) याची संबंधित मनी लांड्रिंग प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल गोव्यात ठिकठिकाणी झडती घेतली.
ईडीच्या पथकाने डिजिटल उपकरणांसह काही कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय मनी लाँड्रिंगच्या आरोपाखालीही निबू याची बँक खाती देखील गोठवली आहेत. निबू याला एप्रिल २०२५ मध्ये गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने बायणा-वास्को येथून अटक केली होती. त्याच्याकडून ४.२३५ किलो कोकेन जप्त केले होते. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे ४१ कोटीं रुपयांपेक्षा अधिक आहे. निबू समवेत त्याच्या अन्य दोन साथीदारांनाही अटक केली होती.
३० ठिकाणी धडक
आमदार के. सी. वीरेंद्र यांच्याशी संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीने देशभरात ३० कॅसिनोंच्या कार्यालयांवर छापेमारी केली आहे. यात चित्रदुर्ग, बंगळुरू, जोधपूर, हुबळी, मुंबई व गोव्यातील कॅसिनों तसेच अन्य आस्थापनांचा समावेश आहे. आमदार वीरेंद्र यांची या भागीदारी असल्याच्या संशयावरून ही कारवाई झाल्याचे म्हटले आहे. यामुळे मात्र अन्य कॅसिनो चालकांचेही धाबे दणाणले आहेत. दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने आमदार के. सी विरेंद्र यांच्या विरोधात यापूर्वीच गुन्हा नोंद केला आहे.