मैदानाची निगा राखत महसूल मिळवा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पंचायतींना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:47 IST2025-10-06T10:47:02+5:302025-10-06T10:47:37+5:30
आमोणा येथे कृत्रिम टर्फयुक्त मैदानाचे उद्घाटन

मैदानाची निगा राखत महसूल मिळवा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पंचायतींना सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: आमोणा गावातील मोठ्या संख्येने युवक फुटबॉल खेळतात. या गावात फुटबॉल स्पर्धा सुरूच असतात. या खेळाडूंना सुसज्ज मैदान प्राप्त व्हावे यासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, येत्या काळात हे मैदान व यावरील कृत्रिम टर्फ राखून ठेवणे, मैदानाची योग्यप्रकारे निगा राखण्याची जबाबदारी पंचायतीची आहे. त्यासाठी पंचायत निधी न वापरता या मैदानातूनच महसूल निर्मिती करून मैदानाची निगा राखा, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमोणा येथे दिली.
आमोणा येथील मैदानावर सेसा कंपनीतर्फे सुमारे एक कोटी रुपये खर्चुन कृत्रिम टर्फ बसविण्यात आला आहे. या सुसज्ज मैदानाचे उद्घाटन मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर कंपनीचे सीईओ सप्तेश सरदेसाई, पद्मिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत, आमोणाचे सरपंच सागर फडते, उपसरपंच गौरवी गावस, पंचसदस्य वसंत सिनारी, कृष्णा गावस, दीया सावंत, वासुदेव घाडी, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, साखळी युवा उत्सवाचे समन्वयक शाणू उसगावकर, प्रतीक भगत, वीरेंद्र एकावडे उपस्थित होते. सूत्रसंचालन रोहन घाडी यांनी केले.
यावेळी सरपंच सागर फडते यांनी सांगितले की, गावात मैदान होते, परंतु त्यावर टर्फ नसल्याने खेळाडू जखमी होत होते. या मैदानाच्या विकासासाठी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यांनी सेसा कंपनीच्या सामाजिक जबाबदारीतून या मैदानाचा विकास साधण्यासाठी पाऊल उचलले व या मैदानाचा योग्य विकास झालेला आहे.
आमोणा येथे तयार केलेल्या मैदानाची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. एक वर्ष या मैदानाची निगा कंत्राटदार राखणार व त्यानंतर त्याचा ताबा पंचायतीकडे दिला जाणार आहे. पंचायतीने या मैदानावर दर्जेदार स्पर्धा आयोजित करून तसेच अशा स्पर्धासाठी मैदान भाड्याने देऊन महसूल उभा करावा. मैदान गोव्यातील एक मॉडेल मैदान बनविण्याची संधी आमोणा पंचायतीकडे आहे, असे सप्तेश सरदेसाई म्हणाले.
'खेळाडूंनीही मैदानाची काळजी घ्यावी'
गावातील मैदानाची काळजी घेणे ही पंचायतीबरोबरच प्रत्येक खेळाडूची जबाबदारी आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळण्यासाठी सेसा कंपनी मदत करण्यास तयार आहे. ही मदत घेत गावातून प्रशिक्षित खेळाडू तयार करण्यासाठी प्रत्येकाने भर द्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
मुख्यमंत्र्यांची निर्णायक 'पेनल्टी शूट'
या मैदानाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर साखळी युवा उत्सवाच्या अनुषंगाने साखळी भाजप मंडळ व साखळी भाजप युवा मोर्चा यांच्यात प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला. या सामन्यात मुख्यमंत्री सावंत भाजप मंडळाच्या संघाचे प्रतिनिधित्व करीत मैदानावर उतरले. हा सामना बरोबरीत संपल्यानंतर टायब्रेकरवर भाजप मंडळ संघाने हा सामना जिंकला. मुख्यमंत्र्यांनी मारलेली पेनल्टी शूट निर्णायक ठरली.