क्लब पार्टीत ड्रग्सचा ओव्हरडोस; २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू, गोव्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 09:46 IST2026-04-05T09:44:43+5:302026-04-05T09:46:37+5:30

हणजूण येथील घटना. मृत युवक इंदोरचा; खासगी रुग्णालयात उपचारासाठी न घेतल्याची माहिती समोर; पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू; शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

drug overdose at club party 21 year old indore boy dies on the spot stir in goa | क्लब पार्टीत ड्रग्सचा ओव्हरडोस; २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू, गोव्यात खळबळ

क्लब पार्टीत ड्रग्सचा ओव्हरडोस; २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू, गोव्यात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा/हणजूण : हणजूण येथील एका क्लबमध्ये सुरू असलेल्या पार्टीदरम्यान इंदोर येथील २१ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे हा मृत्यू झाल्याचा संशय आहे. या घटनेमुळे राज्यातील क्लब संस्कृती आणि ड्रग्जच्या वाढत्या वापराबाबत पुन्हा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

मृत युवक आपल्या मित्रांसोबत गोव्यात आला होता. शुक्रवारी रात्री हणजूण येथील एका प्रसिद्ध ठिकाणी पार्टी सुरू असताना अचानक या तरुणाची तब्येत खालावली. तो बेशुद्ध पडल्याने मित्रमंडळींमध्ये एकच घबराट पसरली. मित्रांनी तातडीने त्याला उपचारांसाठी जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. 

मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे कारण देत तिथे दाखल करून घेण्यास नकार देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्या युवकाला म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. मृतदेह पुढील तपासासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेत ड्रग्जच्या अतिसेवनाचा संशय व्यक्त होत असून, गोव्यातील पार्टी सर्किटमध्ये अमली पदार्थाचा वाढता प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या क्लब्समध्ये अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ लागल्याने प्रशासन आणि पोलिसांवर कडक कारवाईचा दबाव वाढला आहे.

प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आलेल्या खासगी रुग्णालयाने रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिल्याची बाब समोर आली आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय प्रतिसादावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्या युवकाचा जीव गेला का ? याचाही तपास होण्याची शक्यता आहे.

कठोर कारवाईचा इशारा : लोबो

या घटनेची गांभीर्याने दखल घेत आमदार मायकल लोबो यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शवविच्छेदन अहवालानंतर सत्य समोर येईल. नैसर्गिक कारणांशिवाय इतर काही आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल," असा इशारा त्यांनी दिला. तसेच डिलायला लोबो यांनीही सखोल चौकशीचे निर्देश देत, "गैरप्रकार आढळल्यास कोणालाही वाचविले जाणार नाही," असे स्पष्ट केले.

'त्या' बेकायदेशीर इव्हेंटची चौकशी करा : अमित पाटकर

गुड फ्रायडेच्या दिवशी हणजूण येथे आंतरराष्ट्रीय कलाकार 'ब्लॅक कॉफी' याचा आयोजित करण्यात आलेला इव्हेंट पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा आरोप करत त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काल पत्रकार परिषदेत केली. या कार्यक्रमासाठी आवश्यक परवानग्या न घेता तो पार पडला, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

डॉक्टरांचे पॅनल नियुक्त करा : पाटकर

हणजूण येथील पार्टीदरम्यान ड्रग्ज ओव्हरडोसमुळे मृत्यू झालेल्या इंदोरच्या २१ वर्षीय युवकाच्या शवविच्छेदनासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पॅनल नियुक्त करावे, अशी मागणी पाटकर यांनी केली. नेमक्या कोणत्या अमली पदार्थामुळे मृत्यू झाला हे स्पष्ट व्हावे, तसेच या घटनेवरून अमलीपदार्थ विरोधी यंत्रणेचे अपयश उघड झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
 

Web Title : गोवा: क्लब पार्टी में ड्रग ओवरडोज से 21 वर्षीय युवक की मौत

Web Summary : गोवा के अंजुना में एक क्लब पार्टी में ड्रग ओवरडोज के संदेह में इंदौर के 21 वर्षीय युवक की मौत हो गई। प्रारंभिक उपचार से इनकार किया गया। पुलिस घटना की जांच कर रही है, जिससे गोवा की ड्रग संस्कृति के बारे में चिंता बढ़ रही है। अधिकारियों ने सख्त कार्रवाई का वादा किया, अवैध घटनाओं की जांच की मांग की।

Web Title : Goa: Drug overdose at club party kills 21-year-old

Web Summary : A 21-year-old from Indore died in Goa after a suspected drug overdose at a club party in Anjuna. Initial treatment was allegedly denied. Police are investigating the incident, raising concerns about Goa's drug culture. Officials promise strict action, demanding investigation of illegal events.