चालक नशेत, बस उलटली; १ ठार, ३ गंभीर, बिर्ला-वास्को मार्गावरील थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 07:52 IST2025-05-09T07:51:16+5:302025-05-09T07:52:05+5:30

२७ प्रवासी जखमी

driver drunk bus overturns 1 dead and 3 critical thrill on birla vasco route | चालक नशेत, बस उलटली; १ ठार, ३ गंभीर, बिर्ला-वास्को मार्गावरील थरार

चालक नशेत, बस उलटली; १ ठार, ३ गंभीर, बिर्ला-वास्को मार्गावरील थरार

लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस भरधाव वेगात घेऊन जात असताना वेर्णा महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस उलटली. यात बसचा वाहक शिवा मदार (वय २३) हा जागीच ठार झाला, तर ३० प्रवासी जखमी झाले असून, यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. प्राथमिक तपासांत बसचालक अकबर मेहबुब गोजी (वय ४०, फकीरगल्ली-रा. वास्को) दारूच्या नशेत असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी ४.३० वाजता टायटन-बिर्ला परिसरातून प्रवाशांनी खचाखच भरलेली जीए ०६ टी १६७५ क्रमांकाची बसचालक मेहबूब वास्कोच्या दिशेने निघाला होता.

क्विनीनगर जंक्शनजवळ मेहबूबचे बसवरील नियंत्रण सुटले व रस्त्यावर उलटली. त्याचवेळी बसचा दरवाजा उघडल्याने वाहक शिवा हा रस्त्यावर पडून बसखाली चिरडला गेला. त्याचवेळी बसमधील प्रवासीही गंभीर जखमी झाले. बस उलटल्यानंतर प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड केली.

त्याचवेळी जवळपास असणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन बस बचावकार्य सुरू केले. वेर्णा पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमींना रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली. यावेळी वाहतूक पोलिस अधीक्षक प्रमोद शिरवईकर, वाहतूक पोलिस उपअधीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई, पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम, वेर्णा पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर, वास्को पोलिस निरीक्षक वैभव नाईक, मुरगाव पोलिस निरीक्षक शरीफ जॅकीस हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींपैकी १३ जणांना चिखली उपजिल्हा रुग्णालयात, तर काहींना गोमेकॉ रुग्णालयात, तर काहींना कासावली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच बसचालक गोजी याची वैद्यकीय तपासणी केली आहे.

दरम्यान, कुठ्ठाळीचे आमदार अँथनी वास यांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिस व प्रत्यक्षदर्शी यांच्याशी चर्चा करून अपघाताची माहिती घेतली. यावेळी जखमींना तातडीने उपचार देण्यासाठी सूचनाही केल्या.

बसचालकच जबाबदार

बसमध्ये दरवाजापर्यंत प्रवासी उभे होते. चालकाने याचे भान ठेवून बस चालविणे गरजेचे होते. अपघातानंतर थोडावेळ आम्हाला काही समजलेच नाही. त्यानंतर मदतीसाठी आरडाओरड सुरू झाली. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळेच अपघाताची घटना घडल्याची माहिती जखमी प्रवासी सोनल नमशेकर हिने दिली आहे.

Web Title: driver drunk bus overturns 1 dead and 3 critical thrill on birla vasco route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.