कुत्र्याचा अपघाती मृत्यू, मर्सिडीज चालकाला १५० रुपये दंड; प्राणीमित्र नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 07:28 IST2026-01-22T07:28:30+5:302026-01-22T07:28:30+5:30
या निकालामुळे प्राणीमित्र आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कुत्र्याचा अपघाती मृत्यू, मर्सिडीज चालकाला १५० रुपये दंड; प्राणीमित्र नाराज
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पणजी येथे २०२४ मध्ये मर्सिडीज-बेंझ या आलिशान कारखाली कुत्र्याला चिरडून ठार केल्याच्या प्रकरणात उत्तर गोवा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने (जेएमएफसी) संबंधित चालकाला अवघा १५० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या निकालामुळे प्राणीमित्र आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उत्तर गोवा जिल्हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक संस्था (एसपीसीए) यांनी स्वयंस्फूर्त दखल घेत चालकाविरोधात तक्रार दाखल केली होती. मर्सिडीज कार चालवणाऱ्या चालकाचे नाव नाटेकर असून त्याच्याविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
सुनावणीदरम्यान नाटेकर याने न्यायालयासमोर गुन्ह्याची कबुली देत ही घटना अनवधानाने घडल्याचा दावा केला. आपण प्रथमच अशा प्रकारचा गुन्हा केल्याचे सांगत, आपले वय ५० ते ६० वर्षांच्या दरम्यान असून आपण कुटुंबाचा एकमेव कमावता सदस्य असल्याचे सांगत सौम्य शिक्षा देण्याची विनंती त्याच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. या युक्तिवादांचा विचार करून जेएमएफसी न्यायालयाने नाटेकर यांना दोषी ठरवत १५० रुपयांचा दंड ठोठावला.
प्राणीमित्र नाराज
मात्र, गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी अत्यंत तुटपुंजी शिक्षा दिल्याने प्राणीहक्क कार्यकर्ते व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशा निकालांमुळे प्राणी क्रूरतेला अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळते, अशी भावना व्यक्त होत आहे.