वीज दरवाढीवर बोलण्यापूर्वी अभ्यास करा; वीज मंत्री ढवळीकर यांचा विरोधकांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 10:54 IST2025-10-08T10:53:29+5:302025-10-08T10:54:21+5:30
ढवळी येथे एका कार्यक्रमाप्रसंगी वीज दरवाढीच्या विषयी विचारला ते बोलत होते.

वीज दरवाढीवर बोलण्यापूर्वी अभ्यास करा; वीज मंत्री ढवळीकर यांचा विरोधकांना सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यात वीज दरवाढ झाली असली तरी इतर राज्याच्या तुलनेत गोव्याचा वीज दर खूपच कमी आहे. जे विरोधी पक्ष यासंबंधी आवाज उठवण्याचे नाटक करतात, त्यांनी अगोदर या विषयाचा अभ्यास करावा व नंतरच यावर भाष्य करावे, असा सल्ला वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिले आहे.
ढवळी येथे एका कार्यक्रमाप्रसंगी वीज दरवाढीच्या विषयी विचारला ते बोलत होते. मंत्री ढवळीकर यांनी रिवोल्यूशनरी गोवन पक्षावर टीका केली. ते म्हणाले, की वीज दरवाढीचा मुद्दा घेऊन आरजीचे मोजकेच लोक फिरत आहेत. ज्या लोकांकडे पंचायत स्तरावर निवडून येण्याची क्षमता नाही, तेच लोकांची दिशाभूल करत आहेत. मुळात त्यांना कोणतेच व्यासपीठ उपलब्ध नसल्याने ते नाटकबाजी करत आहेत. उंडिर मलनिस्सारण प्रकल्पालाही सुरुवातीला याच लोकांनी खो घातला होता. चांगल्या प्रकल्पांना विरोध करण्याची मानसिकता घेऊनच हे लोक समाजात वावरत आहेत.
विजय यांचा अभ्यास नाही
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांच्यावर टीका करताना ढवळीकर म्हणाले, की त्यांनीही अजून या विषयाचा अभ्यास केलेला दिसत नाही. त्यांच्याच मतदारसंघात वीज खात्यामार्फत १०० कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत. संपूर्ण गोव्यात कोट्यावधी रुपयांची कामे सुरू आहेत. हा पैसा टप्याटप्याने आम्ही सरकारच्या तिजोरीत परत घेत आहोत. याच पैशांमधून भविष्यातील साधन सुविधा निर्माण केल्या जातील.
गोव्याचे वीज दर जास्त असल्याचे गोवा फॉरवर्ड सांगत आहे. सरदेसाई यांचे सचिव मूळ कर्नाटक येथील आहेत. कर्नाटकमध्ये वीज तयार होत असतानाही तेथे वीज दर हा गोव्याच्या तुलनेत जास्त आहे.
५५०० कोटींची गुंतवणूक
पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळात वीज क्षेत्रात ज्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यावरच एवढे दिवस काढले जात होते. त्यानंतर आलेल्या सरकारने तुटलेल्या वाहिन्या जोडण्याचे काम केले. मात्र, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुमारे ५५०० कोटींची गुंतवणूक केली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आगामी काळात दिसणार आहेत. हे सर्व लोकांच्या सोयीसुविधांसाठीच करत आहोत. केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसारच ही दरवाढ केली आहे, हे विरोधांनी लक्षात घ्यावे.
सूर्यघर योजनेतून तीनशे युनिट वीज मोफत मिळणार
जीएसटी व अन्य कर दरात कपात करून आम्ही लोकांना फायदा करून देण्यासाठी योजना राबवलेल्या आहेत. वाहनांचे दर उतरलेले आहेत. आगामी काळात पेट्रोलचे दरही उतरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सूर्यघर योजने अंतर्गत तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे ठरवले आहे, असे ढवळीकर म्हणाले.