५० ते ६० टक्के आमदारांची तिकिटे कापल्यास आश्चर्य वाटू नये: भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक
By किशोर कुबल | Updated: August 26, 2025 08:30 IST2025-08-26T08:29:20+5:302025-08-26T08:30:20+5:30
लोकमत विशेष: दुरावलेल्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांना सक्रिय करू

५० ते ६० टक्के आमदारांची तिकिटे कापल्यास आश्चर्य वाटू नये: भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक
किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : '२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ५० ते ६० टक्के विद्यमान आमदारांची तिकिटे कापली गेल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही,' असे विधान प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले. यावेळी उमेदवारी देण्याबाबतीत पक्ष काटेकोर राहणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे.
'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते म्हणाले की, कार्यक्षमता, जिंकून येण्याची क्षमता, लोकांशी असलेला संपर्क व पक्षाकडील निष्ठा या गोष्टी तपासूनच उमेदवारी दिली जाणार आहे. पक्षाचे विद्यमान आमदार लोकांकडे कसे वागतात, जनतेची कामे करतात का? या गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मंत्र्यांच्या बाबतीत रिपोर्ट कार्डे तयार करून केंद्रीय नेत्यांकडे पाठवली आहेत.
आगामी दोन वर्षे निवडणुकांचीच आहेत. येत्या डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायत निवडणुका होतील. त्यानंतर पालिका निवडणुका व नंतर २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होईल. या सर्व निवडणुकांची तयारी कशी काय चालली आहे? असा प्रश्न केला असता दामू म्हणाले की, पक्षाचे काम नेहमीच चालू असते. निवडणूक झाल्यावर आम्ही स्वस्थ बसतो, अशातला भाग नाही.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाबद्दल विचारले असता दामू म्हणाले की, प्रशासन गतिमान झालेले आहे. लोकांची कामे लवकर व्हावीत यासाठी डिजिटलायझेशन झाले. ऑनलाइन दाखले मिळण्याची सोय झाली. लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे कल्याणकारी योजनांचे पैसे थेट जमा होऊ लागले आहेत. प्रशासन लोकांच्या दारी आले आहे.
५९३ जुने कार्यकर्ते सक्रिय करणार
दामू म्हणाले की, नवे व जुने अशा सर्वच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचे आहे. काही कारणास्तव दुरावलेले अनेक जुने नेते, कार्यकर्ते येणाऱ्या काळात पक्षाचे काम जोमात सुरू करतील. जोडलेला कार्यकर्ता आमच्यापासून दूर जाऊ नये, वैयक्तिक कारणास्तव पक्षापासून दूर झालेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात आणावे यासाठी आम्ही जोमाने काम करणार आहोत. आतापर्यंत ५९३ जुन्या कार्यकर्त्यांची यादी तयार केली आहे जे सध्या सक्रिय नाहीत. त्यांना पुन्हा सक्रिय केले जाईल व त्यांचाही योग्य सन्मान केला जाईल.
काम खूप, आव्हानांचाही डोंगर
१८ जानेवारी २०२५ रोजी दामू यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे घेतली. त्यानंतरच्या गेल्या आठ महिन्यांच्या प्रवासाबद्दल विचारले असता दामू म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर मी जुन्या, नव्या अशा सर्वच कार्यकर्त्यांना भेटताना संपूर्ण गोवा पिंजून काढला. काम खूप आहे, तसेच आव्हानांचाही डोंगर आहे. पक्षाची ध्येय धोरणे जपूनच रणनीती आखायची आहे. पक्ष नेतृत्वाने दिलेले कार्यक्रम योग्यरीत्या पार पाडले. सर्व समाजांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. पक्षाला याचा फायदा करून द्यायचा आहे, या दृष्टिकोनातून काम केले.
संघटनात्मक बदल होणार
आगामी निवडणुका लक्षात घेता नजीकच्या काळात संघटनात्मक बदल होणार का? या प्रश्नावर दामू म्हणाले की, चतुर्थीनंतर राज्य कार्यकारिणी तसेच महिला मोर्चा, युवा मोर्चा आदी पक्षाच्या सात विविध आघाड्या तसेच वीस प्रकोष्ठ जाहीर होतील. भाजपात येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. परंतु काहीजणांना पक्षाची चौकट ठाऊक नाही. अशा कार्यकर्त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.
एसटींना २०२७ला आरक्षण शक्य
एसटी समाजाला विधानसभा निवडणुकीत आरक्षण देण्यासाठी केंद्रात पक्षाने विधेयक संमत करून घेतले. २०२७ च्या निवडणुकीत हे आरक्षण मिळेल यासाठी प्रयत्न चालू आहेत. भंडारी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पक्षाने आजवर व्यवस्थित धोरण अवलंबल्याचे ते म्हणाले.