ज्ञानेश्वरी आजही मानवाला दिशा देणारी : सदानंद मोरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 07:42 IST2026-03-30T07:41:43+5:302026-03-30T07:42:15+5:30
फोंड्यात 'ज्ञानेश्वरी ग्रंथाची विद्यमान युगातील प्रस्तुतता'वर व्याख्यान

ज्ञानेश्वरी आजही मानवाला दिशा देणारी : सदानंद मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : युरोपीय भाषांच्या विकासापूर्वीच मराठी भाषेची जडणघडण झाली असून, तिचे महत्त्व आज जाणून घेण्याची गरज आहे. संतांनी आपल्या ग्रंथांद्वारे मराठी भाषा व संस्कृती जतन केली असून, 'ज्ञानेश्वरी' सह संत साहित्य हे जगासाठी मौल्यवान ठेवे आहेत. त्यातील मूल्यविचार कधीही कालबाह्य होणार नाहीत, असे प्रतिपादन पुणे येथील साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
गोवा विद्यापीठाच्या संत सोहिरोबानाथ आंबिये अध्यासन मराठी अध्ययन शाखा आणि गोवा मराठी अकादमी, फोंडा तालुका प्रभाग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'ज्ञानेश्वरी ग्रंथाची विद्यमान युगातील प्रस्तुतता' या व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रम संयोजक डॉ. विनय मडगावकर, गोवा मराठी अकादमीचे फोंडा तालुका अध्यक्ष नीलेश नाईक आणि आदर्श नाईक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. तसेच आदर्श नाईक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हा कार्यक्रम येथील राजीव गांधी कला मंदिराच्या परिषद सभागृहात झाला.
डॉ. मोरे यांनी 'ज्ञानेश्वरी' हा आजच्या युगातही मानवाला दिशा देणारा ग्रंथ असल्याचे सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर भाष्य करत त्यांनी तंत्रज्ञानाचा अतिरेक टाळण्याचे आणि त्यात नीतिमूल्यांचा समावेश करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भविष्यात ही यंत्रणा माणसांपेक्षा अधिक बुद्धिमान झाली, तर विविध समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ती माणसाची सहाय्यक व मैत्रीण म्हणूनच कार्यरत रहावी, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे, असेही डॉ. मोरे यांनी नमूद केले.
डॉ. विनय मडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यात सुरू असलेले संतांविषयीचे संशोधनकार्य उल्लेखनीय आहे. सुरुवातीला डॉ. विनय मडगावकर यांनी प्रस्तावना केली, तर नीलेश नाईक यांनी स्वागत केले. आदर्श नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुशांत नाईक यांनी केले.