मांगल्याचे उजळले दीप, नरकासुर दहनानंतर दिवाळी सणाचा उत्साह; राज्यात सर्वत्र चैतन्यमय वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:29 IST2025-10-20T12:29:13+5:302025-10-20T12:29:28+5:30
आश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी ते कार्तिक महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथीपर्यंत दिवाळी सण साजरा केला जातो.

मांगल्याचे उजळले दीप, नरकासुर दहनानंतर दिवाळी सणाचा उत्साह; राज्यात सर्वत्र चैतन्यमय वातावरण
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मांगल्याचे प्रतीक असलेला, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवाळी सण घरोघरी उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. उद्या मंगळवारी लक्ष्मीपूजन साजरे केले जाईल. पहाटे नरकासूर दहनानंतर लोकांनी घरासमोर रांगोळ्या रेखाटल्या तसेच गोडधोड पदार्थही केले. घरोघरी आकाशकंदील वगैरे लावून दिव्यांची रोषणाई करण्यात आली. आश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी ते कार्तिक महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथीपर्यंत दिवाळी सण साजरा केला जातो.
गोव्यातही पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करण्याची, रांगोळ्या रेखाटून, दरवाजाला तोरणे बांधून पणत्यांची आरास करण्याची परंपरा आहे. कारीट फळ डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडतात व गोडधोड खाऊन हा सण साजरा केला जातो. लक्ष्मीपूजन उद्या मंगळवारी आहे, तर बलिप्रतिपदा बुधवारी (दि.२२) आणि भाऊबीज गुरुवारी (दि. २३) रोजी साजरी केली जाणार आहे.
शहरांमध्ये तसेच गावागावात अनेक मंडळांनी नरकासूर प्रतिमा बनविल्या होत्या. लोक रात्री उशिरापर्यंत या प्रतिमा पाहण्यासाठी फिरत होते. शहरांमध्ये स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, दिवाळीच्या या आनंदाला अग्निशामक दलाचे जवान आणि अधिकारी मुकतात. रस्त्यारस्त्यांवर पहाटे दहन केलेल्या नरकासुरांची धगधगत असलेली आग मालविणे, राख गोळा करणे यातच त्यांची सकाळ जाते. नरकारसूर पेटवून लोक घरी जातात. मात्र त्यानंतरही रस्त्यांवर आग धगधगत असते. इकडे धाव तिकडे धाव करताना जवानांची दमछाक होते. दहन केलेल्या नरकासुरांचे लोखंडी सांगाडे, खिळे आग विझवून बाजूला काढावे लागतात. राखेचा ढीग साचलेला असतो, तो साफ करावा लागतो. दुपारनंतर घरी परतल्यावरच त्यांचे 'अभ्यंगस्नान' होते.
चोख पोलिस बंदोबस्त
सुरक्षा बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी नरकासूर उभे केलेले असतात. तेथे वाहतूक कोंडी, मारामारीचे प्रकार किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात केला. रात्री गस्तीवरील पोलिसांची संख्या वाढवली होती.
लाइनमनही रात्री ड्युटीला
दीपावलीनिमित्त घरोघरी रोषणाई केली जात असल्याने विजेचा वापर वाढलेला असतो व त्यामुळे वीज ट्रीप होण्याचे प्रकार घडतात. दिवाळीच्या दिवशी वीज खात्याच्या लाइनमनचे काम कितीतरी पटींनी वाढते. लाइनमनना कामावर यावे लागते. सुमारे एक हजार लाइनमन बजावतात ड्युटी बजावतात, असे वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस यांनी सांगितले.
रविवारीही खरेदीला गर्दी
काल रविवारी सुटीचा दिवस असूनही रात्री उशिरापर्यंत बाजारपेठा फुलल्या होत्या. कपडे, सोन्याचे दागिने तसेच मिठाई व फुलांची खरेदी जोमात चालली होती.
पावसाचा तडाखा, उत्साहावर पाणी
काल रात्री अनेक ठिकाणी गडगडाटासह पाऊस झाल्याने नरकासुर मिरवणूकांवर त्याचा परिणाम झाला. अवाढव्य असे नरकासूर प्रतिमा तयार केले होते पण पावसामुळे त्यांना आपल्या नरकासुर प्रतिमावर ताडपत्री घालावी लागली. यामुळे मिरवणुका उशीरा निघाल्या. पाऊस कमी झाल्यानंतर लोकांनी या नरकासुर प्रतिमा पाहण्याचा आनंद लुटला. दरम्यान, हवामान खात्याने आज, सोमवारीही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हलका ते मध्यम पाऊस कोसळू शकतो.