जिल्हा पंचायत निवडणूक विधानसभेची सेमीफायनल: आमदार विजय सरदेसाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 09:17 IST2025-11-20T09:17:20+5:302025-11-20T09:17:43+5:30
श्रीस्थळ येथे माजी मंत्री इजिदोर फर्नांडिस यांचा कार्यकर्त्यांसह गोवा फॉरवर्ड पक्षामध्ये प्रवेश

जिल्हा पंचायत निवडणूक विधानसभेची सेमीफायनल: आमदार विजय सरदेसाई
लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण : जिल्हा पंचायत निवडणूक ही विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल असते. २०१९ पासून नोकऱ्या विकल्या जात आहेत, तर आता दरोडे पडू लागले आहेत. गोवा 'डाकूंनी चालवणारे राज्य' बनले आहे. राज्यात सध्या अघोषित आणीबाणी आहे आणि राज्य हे बेरोजगारीत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे, असा घणाघात आमदार विजय सरदेसाई यांनी केला.
काणकोणचे माजी आमदार तथा माजी मंत्री इजिदोर फर्नाडिस यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला. श्रीस्थळ येथील कार्यक्रमात गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रवेशकर्त्यांमध्ये काणकोण पालिका नगरसेवक शुभम कोमरपंत, पंच आनंद गावकर, दुदू गावकर, सोमदत्त देशमुख, अँथोनी, प्रशांत कोमरपंत, यशवंत वेळीप, वैभव शेट देसाई, डॉ. केजी सिल्वा, गणेश गावकर, संतोष गावकर, पुनो वेळीप, उल्हास मडीवळ, पंच अशोक वेळीप यांचा सहभाग आहे.
यावेळी व्यासपीठावर पक्षाचे उपाध्यक्ष मोहनदास लोलयेकर, सरचिटणीस दुर्गादास कामत, पैंगीण जि. पंचायतीचे पक्षाचे उमेदवार प्रशांत नाईक, मंडळ अध्यक्ष दत्ता गावकर, उमेश तुबकी, गुरू बांदेकर, पंच दशरथ गावकर व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत दत्ता गावकर यांनी केले, सूत्रसंचालन विकास भगत यांनी केले, तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
भाजपात काय बोलायचे ते वरून सांगतात
माजी मंत्री फर्नाडिस यांनी भाजप सोडण्यामागील कारणे स्पष्ट करताना सत्ताधारी पक्षावर थेट निशाणा साधला. भाजपात आम्हाला काय बोलायचे ते वरून सांगितले जायचे. मनातील प्रश्न उपस्थित करण्याची मुभा नव्हती. आता गोव्याचे प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीत धाव घेण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. तसेच, २०२७च्या विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्ष तिकीट देईल की नाही माहीत नाही; मात्र त्याबाबत अट आपण ठेवली आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.
घरे बांधून दिली, परंतु गाजावाजा केला नाही
उपाध्यक्ष मोहनदास लोलयेकर यांनी २०१९ च्या पूरग्रस्तांसाठी केलेल्या मदतीची आठवण करून दिली. ज्यांची घरे वाहून गेली, त्यांची घरे आम्ही बांधून दिली; श्रमधामासारखा गाजावाजा केला नाही, असे ते म्हणाले. प्रशांत नाईक यांनी राजकारणातील 'बेरजेचे गणित' अधोरेखित केले, तर शुभम कोमरपंत यांनी भाजपवर 'वापरा आणि फेका' धोरणाचा आरोप केला.
राज्यात भ्रष्टाचार बोकाळला असून त्याला स्थानिक सत्ताधारीही नाकारू शकत नाहीत. गोवा फॉरवर्ड पक्षाला बळकट करण्यासाठी इजिदोर फर्नाडिससारख्या व्यक्तीची गरज आहे. ते 'कुटुंबातील नवा सदस्य' आहेत. - विजय सरदेसाई, आमदार तथा गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष.