दिगंबर कामत चक्रव्यूहात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 12:33 IST2025-05-25T12:32:36+5:302025-05-25T12:33:37+5:30
आता २०२७ ची विधानसभा निवडणूक दिगंबर कामत यांची शेवटची असेल का पाहावे लागेल. त्यांचा मुलगा मडगावमध्ये जिंकू शकत नाही, असे लोक बोलतात. मात्र शेवटी हे राजकारण आहे. लोक परिवर्तनही करतात, काही मतदारसंघांत निवडणुकीवेळी असा अनुभव येतो.

दिगंबर कामत चक्रव्यूहात
सदगुरू पाटील, संपादक
आता २०२७ ची विधानसभा निवडणूक दिगंबर कामत यांची शेवटची असेल का पाहावे लागेल. त्यांचा मुलगा मडगावमध्ये जिंकू शकत नाही, असे लोक बोलतात. मात्र शेवटी हे राजकारण आहे. लोक परिवर्तनही करतात, काही मतदारसंघांत निवडणुकीवेळी असा अनुभव येतो. गोव्यात अनेक राजकारणी दोन तीनवेळा जिंकून संपले; पण रवी नाईक, माविन, सुभाष शिरोडकर, सुदिन आणि दिगंबर टिकले. कारण जनतेशी असलेला कनेक्ट. तरीही पुढील वर्षी मडगावी राजकीय समीकरणे कशी आकार घेतात ते पाहूया.
दिगंबर कामत है मोजक्याच राजकीय नेत्यांपैकी एक, जे मुख्यमंत्रिपदी होते तेव्हाही कधीच सत्ता त्यांच्या डोक्यात भिनली नव्हती. मी पत्रकार या नात्याने अनेकदा मुलाखती, पत्रकार परिषद किंवा वृत्त संकलन अशा कामांसाठी त्यांना भेटायचो. एखादी बातमी आपल्या विरोधात आली म्हणून त्यांनी
कधी संताप केला नाही. उलट काहीवेळा हसून 'आरे तशें ना रे ते. तू बरोवच्या पयली मात्सो माका फोन लावन वस्तुस्थिती विचारपाक जाय आसली.' असे टिपिकल बोलून दिगंबर कामत शांत व्हायचे.
कधी कधी कामत दिल्लीत सोनिया गांधी आणि मागरिट अल्वा यांना भेटायला जायचे. त्या भेटीची गुप्त चर्चा किंवा बातमी कळावी म्हणून मी रात्री साडेअकरा वा बारा वाजता फोन करायचो आणि कामत न कंटाळता बोलायचे. एकदा कामत दिल्लीत होते व मला माहिती मिळाली की त्यावेळचे अर्थमंत्री दयानंद नार्वेकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार आहे. मी कामत यांना फोन केला. ते सोनिया गांधींना भेटले होते. त्यावेळी काँग्रेसचे प्रभारी म्हणून हरीप्रसाद काम पाहायचे. कामत यांनी मला सांगितले की 'नार्वेकर यांना मंत्रिमंडळातून काढण्याचा प्रस्ताव नाही. मला उगाच राजकीय वाद नको.' कामत यांचे म्हणणे ऐकले तरी मी खरी तिच बातमी पहिल्या पानावर दिली. 'नार्वेकर यांना डच्चू निश्चित.' कामत नाराज झाले. पण दोनच दिवसांत नार्वेकर यांना त्यावेळी मंत्रिमंडळातून काढले गेले. नार्वेकर यांच्या गुडघ्यावर त्यावेळी शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे ते घराबाहेर पडू शकत नव्हते. जखम ताजी होती. नार्वेकर धावपळ करू शकत नव्हते, हे हरीप्रसाद व कामत यांनी ओळखले होते. नार्वेकर यांनी मग काही वर्षे दिगंबर कामत यांच्यावर खूप राग धरला होता. खाण खात्याला कायम टार्गेट केले. नार्वेकर यांनी एकदा मला सांगितले की, 'खरे म्हणजे माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने माझी विचारपूस करायला दिगंबर कामत माझ्या धुळेर येथील घरी आले होते. माझ्या घरी तयार केलेला मस्त शिरा आणि चहा मी त्यांना दिला. कामत यांनी डायबिटीस असूनदेखील शिरा आणखी एकदा आपुलकीने मागून खाल्ला. आणि दुसऱ्या दिवशी मला मंत्रिमंडळातून काढले.'
अर्थात राजकारण हे असेच असते. बेसावध क्षणी डाव खेळले जातात. त्यात कामत यांचा पूर्ण दोष नव्हता. कारण त्यावेळी सुदिन ढवळीकर, विश्वजित राणे वगैरे नेते नार्वेकर यांच्या विरोधात होते. ते का विरोधात होते आणि अर्थ खाते त्यावेळी कसे वागत होते, यावर एक स्वतंत्र लेख कधी तरी लिहिता येईल. बाबूश मोन्सेरात तेव्हा आमदार होते, मंत्री नव्हते, पण त्यांनीही नार्वेकर यांना टार्गेट केले होते. त्यामुळे दोनपावलचा आयटी हॅबिटॅट प्रकल्प तेव्हा भस्मसात झाला.
कामत यांना शांत स्वभावाची दैवी देणगी लाभली आहे. मडगाव मतदारसंघात आता सर्व विरोधी राजकारणी कामत यांना घेरू पाहात आहेत. विजय सरदेसाई यांच्याशी कामत यांचे अजिबात पटत नाही. मोती डोंगराच्या व्होट बँकेला सुरुंग लावला जात आहे. सारस्वत समाजातील काहीजण आता इच्छुक उमेदवार झाले आहेत. शिवाय सावियो कुतिन्हो आणि इतरांनी सातत्याने कामत यांना लक्ष्य बनवले आहेच. मडगावच्या वाढत्या समस्यांवर उजेड टाकून कामत यांना प्रभव नायक, चिराग नायक घाम काढत आहेत. मात्र दिगंबर कामत हे विजयला किंवा इतरांनाही उत्तर देत नाहीत. शेवटी लोक, मतदार काय ते ठरवतील, असे कामत शांत स्वरात बोलतात.
कामत यांना मडगावमध्ये खूप राजकीय शत्रू निर्माण झाले आहेत. कारण अनेक वर्षे ते आमदार आहेत. २००७ साली मुख्यमंत्री होणे हा त्यांचा सर्वात मोठा यशस्वी टप्पा होता. मुख्यमंत्री या नात्याने सामान्य माणसांसाठी कामत यांनी अर्थसाह्य देण्याच्या चांगल्या योजना राबवल्या. त्यावेळी सोशल मीडिया सक्रिय नव्हताच. त्यामुळे कामत हे नीट मार्केटिंग व जाहिरातबाजी करू शकले नाहीत. कामत यांनी मिकी पाशेको, जितेंद्र देशप्रभू यांना काही मोठ्या प्रकरणावरून तुरुंगाची वाट दाखवली होती. वास्तविक कामत हे मुख्यमंत्री म्हणून त्यावेळीही चक्रव्यूहातच होते. चर्चिल आलेमाव, ज्योकिम आणि विश्वजित राणे त्यावेळी त्यांना खूप छळत होते. कामत काहीवेळा खूप कंटाळले होते. ते प्रतापसिंग राणे आणि शरद पवार यांना आपले दुःख व त्रास सांगायचे. पवारांमुळेच ते सरकार टिकले होते. विश्वजित राणे यांनी परवा मडगावला जाहीरपणे दिगंबर कामत यांची माफी मागितली. कामत यांना आपल्यामुळे त्यावेळी त्रास झाला होता, हे विश्वजित यांना कळते. मात्र विश्वजितची माफीची खेळी पाहून कदाचित विजय सरदेसाई यांनाही धक्का बसला असेल.
कामत हे विजय सरदेसाई यांच्यावर टीका करणे टाळतात. एकेकाळी स्व. मनोहर पर्रीकर यांनी दिगंबर कामत यांना राजकीयदृष्ट्या पूर्ण संपविण्याचा मोठा प्रयत्न केला होता. कामत हे आतापर्यंत अनेक विरोधकांना पुरून उरले. पोलिस चौकशीलाही ते सामोरे गेले. भाजपमध्ये गेल्यामुळे ते सुरक्षित झाले.
पर्रीकर जर आज हयात असते तर कामत यांना राजकीयदृष्ट्या उभे राहाताच आले नसते. आता २०२७ ची विधानसभा निवडणूक दिगंबर कामत यांची शेवटची असेल का पाहावे लागेल. त्यांचा मुलगा मडगाव मध्ये जिंकू शकत नाही, असे लोक बोलतात. मात्र शेवटी हे राजकारण आहे. दर सहा महिन्यांनी जनतेचा मूड बदलत असतो. लोक परिवर्तनही करतात, काही मतदारसंघांत निवडणुकीवेळी असा अनुभव येतो.
गोव्यात अनेक राजकारणी दोन तीनवेळा जिंकून संपले; पण रवी नाईक, माविन, सुभाष शिरोडकर, सुदिन आणि दिगंबर टिकले. कारण जनतेशी असलेला कनेक्ट. तरीही पुढील वर्षी मडगावी राजकीय समीकरणे कशी आकार घेतात ते पाहूया.
सर्व विरोधकांनी जर कामत यांना घेरले तर काय होईल? नव्या इच्छुक उमेदवारांना कमी लेखता येत नाही. शिवाय भाजपमध्येही कामत यांचे काही छुपे विरोधक आहेत. भाजपमध्ये जाऊनदेखील कामत यांना मंत्रिपद मिळालेले नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे.