डिचोली पोलिस स्थानक ठरले उत्कृष्ट; देशात पाचव्या स्थानावर, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 11:17 IST2025-12-06T11:16:50+5:302025-12-06T11:17:27+5:30
गोवा पोलिस आणि गृह खात्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

डिचोली पोलिस स्थानक ठरले उत्कृष्ट; देशात पाचव्या स्थानावर, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: डिचोली पोलिस स्थानक हे देशातील पाचवे उत्कृष्ट पोलिस स्थानक ठरले आहे. केंद्रीय गृह खात्याने २०२५ मधील देशातील उत्कृष्ट पोलिस स्थानकांची यादी जाहीर केली असून त्यात त्याचा समावेश केला आहे. गोवा पोलिस आणि गृह खात्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
तत्कालीन उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. तसेच पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्थानकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे, गुन्ह्यांचा तपास आदी निकषांवर डिचोली पोलिस स्थानक पात्र ठरले आहे.
पोलिस स्थानकात पायाभूत सुविधांमध्ये मुलांसाठी अनुकूल खोली, जीम, कॅटिन, स्वच्छ बॅरेक इत्यादींचा समावेश केला आहे. सप्टेंबरमध्ये गृह मंत्रालयाच्या पथकाने सर्व्हेक्षण केलेले.
पहरगावची बाजी
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या देशातील उत्कृष्ट पोलिस स्थानकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर दक्षिण अंदमान निकोबार बेटावरील पहरगाव पोलिस स्थानक, दुसऱ्या क्रमांकावर उत्तर दिल्लीतील गाजीपूर पोलिस स्थानक, तिसरा क्रमांक रायचूर-कर्नाटक येथील कविताल पोलिस स्थानकाचा तर चौथा क्रमांक हा सरेकेला-झारखंड येथील चौका पोलिस स्थानकाने प्राप्त केला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या देशातील उत्कृष्ट पोलिस स्थानकाच्च्या यादीनुसार डिचोली पोलिस स्थानक देशातील पाचव्या क्रमाकांवर येणे ही गोव्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. गोवा सरकार हे नेहमीच दक्ष तसेच नागरिक केंद्रीत धोरणावर काम करते. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.