दिल्लीवाल्यांची घरे नावावर करणार नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 14:43 IST2025-12-11T14:42:32+5:302025-12-11T14:43:39+5:30
धारगळ जि. पं. निवडणुकीतील युतीचे उमेदवार श्रीकृष्ण हरमलकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

दिल्लीवाल्यांची घरे नावावर करणार नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : दिल्लीवाल्यांची घरे आम्ही नावावर करणार नाही. मात्र, सर्वसामान्य नागरिकांची घरे त्यांच्या नावावर करण्यासाठी कायदा आणलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे दुर्लक्ष करत युतीच्या उमेदवाराला बळ द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
धारगळ जिल्हा पंचायत निवडणुकीचे युतीचे उमेदवार श्रीकृष्ण हरमलकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रे आमदार जीत आरोलकर, माजी आमदार दयानंद सोपटे, उमेदवार श्रीकृष्ण हरमलकर, जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, सरपंच अर्जुन कानोळकर व पंच सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, विरोधी पक्षाचे नेते विधानसभेत 'मजे घर' योजनेंतर्गत विरोध करतात. ती योजना सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आहे. भाजपची ताकद वाढवण्यासाठी या निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना पाठबळ देण्याचे आवाहन सावंत यांनी केले. उमेदवार श्रीकृष्ण हरमलकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
फुटबॉल खेळत राजकारणात
श्रीकृष्ण हरमलकर आणि आपण स्वतः दोघेजण शेतात मळ्यात फुटबॉल खेळत होतो. फुटबॉल खेळता खेळता आता राजकारणात प्रवेश केला त्याचे समाधान मिळत असल्याचा दावा आमदार जीत आरोलकर यांनी केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्वसामान्य जनतेची घरे त्यांच्या नावावर करण्यासाठी 'मजे घर' योजना अंमलात आणलेली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो असे आमदार आरोलकर म्हणाले.
हात बळकट करा : आर्लेकर
भाजप सरकारने केंद्र सरकार व राज्य सरकार मार्फत विविध योजना राबवलेल्या आहे. त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केलेले आहे. आता पुन्हा एकदा भाजपचे हात बळकट करण्यासाठी धारगळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून श्रीकृष्ण हरमलकर यांना बळ देण्याचे आवाहन आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले आहे.
माजी आमदार दयानंद सोपटे म्हणाले, भाजप शिवाय सध्या पर्याय नाही. भाजपने केलेले कार्य यापूर्वीच्या सरकारला जमले नाही. परंतु भाजपने अनेक योजना सर्वसामान्य जनतेला नजरेसमोर ठेवून आणल्या आणि त्याची अंमलबजावणी केली. युतीच्या उमेदवारांचे हात बळकट करावे, असे आवाहन सोपटे यांनी केले.