काँग्रेसकडून घोर निराशा; स्थानिक नेत्यांवर आत्मचिंतन करण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 11:01 IST2025-12-24T11:00:32+5:302025-12-24T11:01:36+5:30
दक्षिण गोव्यात पक्ष सावरला तरी मताधिक्य मात्र झाले कमी : उत्तर गोव्यातील कामगिरीवर पक्षश्रेष्ठीमध्ये पसरली नाराजी

काँग्रेसकडून घोर निराशा; स्थानिक नेत्यांवर आत्मचिंतन करण्याची वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत दक्षिण गोव्यात तब्बल ८ जागांवर विजय मिळवलेल्या काँग्रेसने उत्तर गोव्यात मात्र घोर निराशा केली. दक्षिणेत काँग्रेस काहीसा सावरला असला, तरी मताधिक्य कमी झाले आहे. २०२७ च्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ही कामगिरी अत्यंत खराब मानली जात असून, नेत्यांवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक नेतृत्व मजबूत करणे, नाराज कार्यकर्त्यांना सोबत घेणे आणि विरोधकांचा, तसेच अपक्षांचा वाढता प्रभाव रोखणे ही मोठी आव्हाने काँग्रेससमोर असतील. सांताक्रूझ मतदारसंघ बालेकिल्ला असूनही झेडपी निवडणुकीत काँग्रेसने तो गमावला. हळदोणे मतदारसंघात मेरी ऊर्फ मारिया मिनेझिस (४,७१२) व शिरसई मतदारसंघात नीलेश ज्ञानेश्वर कांबळी (४,७०१) हे काँग्रेसचे दोनच उमेदवार उत्तरेत निवडून आले.
२०२० च्या जिल्हा पंचायत निवडणुकीत सांताक्रूझ ही केवळ एकच जागा काँग्रेसकडे होती. यावेळी गोवा फॉरवर्डशी युती करून काँग्रेसने निवडणूक लढवली. त्यामुळे जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, तो फोल ठरला. येथे आरजीच्या उमेदवार एस्पेरेन्सा ब्रागांझा यांनी अनपेक्षितपणे विजय प्राप्त केला आहे.
खोर्लीमध्ये भाजप उमेदवार १ सिद्धेश श्रीपाद नाईक (५,५९४ मते) हे विजयी झाले असले तरी गोवा फॉरवर्डचे कृष्णा ऊर्फ विक्रम परब (४,७३८), काँग्रेसचे ग्लेन काब्राल (४,५७३) व इतरांनी मिळवलेली मते पाहता भाजपविरोधी मतदानाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. कळंगुट मतदारसंघ २ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मायकल लोबो काँग्रेसच्याच तिकिटावर निवडून आले होते. आता जि. पं. निवडणुकीत भाजपच्या फ्रान्झिला रॉड्रिग्स (५,६४६ मते) या निवडून आल्या.
सासष्टी तालुक्यात मिळाली मतदारांची साथ
दक्षिण गोव्यात नुवे विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो. लोकसभा निवडणुकीत विरियातो फर्नाडिस यांना येथे १६ हजारांहून अधिक मते मिळाली होती. जि. पं. निवडणुकीत नुवेची जागा काँग्रेसला मिळाली, - परंतु मताधिक्य अगदीच कमी आहे. काँग्रेस उमेदवार अॅन्थनी ब्रागांझा यांना ३,४७१, तर - नजीकचे प्रतिस्पर्धी आपचे लुईस मिंगेल बार्रेटो यांना ३,०३१ मते मिळाली. खोला मतदारसंघात काँग्रेस उमेदवार सुमित्रा पागी केवळ ४८ मतांनी विजयी झाल्या. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर संघटनात्मक फेररचना आणि पक्ष नेतृत्वाने जनतेशी थेट संवाद वाढवण्याची गरज निकालातून दिसून येते.
व्होट बँकेला सुरुंग
चिंबल झोपडपट्टीतील ४,५०० मते काँग्रेसची व्होट बँक मानली जात होती. परंतु, यावेळी भाजपने तेथे सुरुंग लावला. एरव्ही या झोपडपट्टीत पाचशेदेखील मते भाजपला मिळत नव्हती. तिथे यावेळी २ हजारांहून अधिक मते भाजपला मिळाली. येथे भाजप उमेदवार गौरी कामत निवडून आल्या. सेंट लॉरेन्समध्ये आरजीच्या तृप्ती बकाल निवडून आल्या. काँग्रेसच्या उज्ज्वला नाईक येथे तिसऱ्या स्थानी फेकल्या गेल्या. उत्तर गोव्यात काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांना धक्का बसला. अनेक मतदारसंघांत मतांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र समोर आले आहे.
झेडपी अध्यक्षपदाचा ७ जानेवारीला निर्णय
दोन्ही जिल्हा पंचायतींचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांवर कोणाची वर्णी लावावी यासंबंधीचा निर्णय ७ जानेवारीपर्यंत होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. ते म्हणाले की, निर्णय घेण्यासाठी ७जानेवारीपर्यंत वेळ आहे आणि या विषयावर पक्षात एकत्रितपणे चर्चा करुनच काय तो निर्णय घेतला जाईल.'