दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:25 IST2025-10-29T12:23:00+5:302025-10-29T12:25:10+5:30
दाऊदच्या ड्रग्स सिंडिकेटचा प्रमुख दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना याला गोव्यातून अटक करण्यात आली आहे.

दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
मुंबई / गोवा - दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी आणि ड्रग्स सिंडिकेटचा प्रमुख दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना याला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईच्या पथकाने ही कारवाई केली असून, या अटकेमुळे दाऊदच्या ड्रग्स नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
डोंगरीत चालवत होता ड्रग्स फॅक्टरी
NCBच्या माहितीनुसार, दानिश चिकना मुंबईतील डोंगरी परिसरात ड्रग्स फॅक्टरी चालवत होता आणि देशभरातील ड्रग नेटवर्कचे व्यवस्थापन करत होता. त्याचे नाव यापूर्वीही अनेक वेळा अंमली पदार्थांच्या व्यापारात आले होते.
2019 मध्ये NCBने डोंगरीतील दाऊदच्या ड्रग फॅक्टरीवर छापा टाकून कोट्यवधी रुपयांची ड्रग्स जप्त केली होती. ही फॅक्टरी भाजीपाला दुकानाच्या आडून चालवली जात होती. त्यावेळी दानिश चिकनाला राजस्थानमधून अटक करण्यात आली होता. काही काळ तुरुंगवास भोगल्यानंतर तो बाहेर आला आणि पुन्हा ड्रग्स व्यापारात सक्रिय झाला.
#BREAKING The NCB arrested fugitive accused Danish Merchant alias Danish Chikna, a close aide of underworld don Dawood Ibrahim, from Goa. He was wanted in an MD drugs case and had been absconding for a long time: Mumbai NCB pic.twitter.com/1kbjEM1RT3
— IANS (@ians_india) October 29, 2025
दाऊदच्या साथीदाराचा मुलगा
स्रोतांच्या माहितीनुसार, दानिश चिकना हा दाऊदचा जुना साथीदार युसुफ चिकना याचा मोठा मुलगा आहे. दाऊद आणि युसुफ या दोघांशी त्याचे घट्ट संबंध असल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून NCB आणि मुंबई पोलिस या दोन्ही संस्था त्याच्या शोधात होत्या. दानिशने अनेक वेळा पोलिसांना चकवा दिला होता. मात्र यावेळी गोव्यात हॉटेलमध्ये लपल्याची माहिती मिळाल्यानंतर NCBने अचानक धाड टाकून त्याला ताब्यात घेतले.
NCBची कारवाई आणि पुढील चौकशी सुरू
NCBच्या अधिकाऱ्यांनी दानिश चिकनाला गोव्यातून मुंबईत आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्याच्याकडून दाऊद इब्राहिमच्या ड्रग्स नेटवर्कविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते, असा अंदाज तपास अधिकाऱ्यांचा आहे. सुरुवातीच्या चौकशीत दानिशकडून अनेक ड्रग तस्करी रॅकेट्स, मनी ट्रान्सफर नेटवर्क्स आणि मुंबईतील वितरण साखळ्यांबाबत माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दाऊदच्या ड्रग्स साम्राज्यावर मोठा धक्का
या कारवाईमुळे दाऊद इब्राहिमच्या ड्रग्स साम्राज्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई, गोवा, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये पसरलेल्या नेटवर्कचा एक मोठा धागा या अटकेमुळे पोलिसांच्या हाती लागला आहे.