दिगंबरा... दिगंबरा... एक सांप्रदायिक जन्मोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:27 IST2025-12-04T11:26:08+5:302025-12-04T11:27:05+5:30
महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते.

दिगंबरा... दिगंबरा... एक सांप्रदायिक जन्मोत्सव
मार्गशीर्ष पौर्णिमेदिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. या दिवशी दत्त जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होतो. दत्त जयंती दिनी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळतो. दत्त जयंती साजरी करण्याबाबत शास्त्रोक्त विशिष्ट विधी नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह म्हणतात.
महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. तमिळनाडूतही दत्त जयंतीची प्रथा आहे. दत्त जयंतीदिनी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो. दत्तयागात पतमान पंचसूक्ताच्या आवृत्त्या (जप) आणि त्याच्या दशांशाने किंवा तृतीयांशाने घृत (तूप) आणि तीळ यांनी हवन करतात.
दत्तयागासाठी केल्या जाणाऱ्या जपाची संख्या निश्चित नाही. पुरोहितांच्या समादेशानुसार जप आणि हवन केले जाते.
दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरू केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णु असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगूर आहे, अशी शिकवण ज्वालेपासून घेतली. चराचरांतील प्रत्येक वस्तूत ईश्वराचे अस्तित्व पाहाण्यासाठी दत्तगुरूंनी चोवीस गुरू केले.
'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार आणि 'श्री नृसिंह सरस्वती' दुसरा अवतार. 'माणिकप्रभू' तिसरे आणि 'श्री स्वामी समर्थ महाराज' चौथे अवतार होत. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत. दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबरवृक्ष यांची पूजा करतात. पूर्वी मूर्ती बहुदा एकमुखी असायची. हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलीत आहे.
दत्त हा 'गुरुदेव' आहे. दत्तात्रेयांना परमगुरू मानले आहे. त्यांची उपासना गुरुस्वरूपातच करावयाची असते. 'श्री गुरुदेव दत्त', 'श्री गुरुदत्त' असा त्यांचा जयघोष करतात. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' ही नामधून आहे.
दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ असा की झोळी हे मधुमक्षिकेचे (मधमाशीचे) प्रतीक आहे. मधमाशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करून एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षा जमवतात. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं लवकर कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे.
संकलन : तुळशीदास गांजेकर, सनातन संस्था