दामू नाईक पंतप्रधान मोदींना भेटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 10:06 IST2025-03-27T10:04:16+5:302025-03-27T10:06:07+5:30
पुढील दोन-तीन दिवसांत गोव्यातून आणखी काही मंत्री, आमदारांनाही दिल्लीत पाचारण केले जाण्याची शक्यता आहे.

दामू नाईक पंतप्रधान मोदींना भेटले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने चर्चेला ऊत आला आहे.
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले आहे. त्यानंतर आता मंत्रिमंडळ पुनर्रचनेच्या बाबतीत राजकीय घडामोडींना वेग येईल, असे मानले जात आहे. पुढील दोन-तीन दिवसांत गोव्यातून आणखी काही मंत्री, आमदारांनाही दिल्लीत पाचारण केले जाण्याची शक्यता आहे.
दामू नाईक यांनी नवी दिल्लीतील संसद भवनात मोदींची भेट घेतली. राजकीय परिस्थितीबद्दल त्यांनी मोदी यांना माहिती दिल्याचे कळते. दरम्यान, दामू यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, त्यांनी राज्य आणि पक्ष संघटनेशी संबंधित विविध विकासात्मक मुद्द्यांवर मोदींशी चर्चा केलेली आहे.
मंत्रिमंडळात बदल होणार
मंत्रिमंडळात बदल होणार, असा बोलबाला गेले अनेक दिवस आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष हे पंधरा दिवसांपूर्वी गोव्यात येऊन गेले होते. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याकडून त्यांनी राजकीय स्थितीची माहिती घेतली होती. दामू यांनी त्यावेळी संतोष यांना ठामपणे काही गोष्टी सांगितल्या होत्या. मंत्रिमंडळात बदल व्हावा, अशी प्रदेशाध्यक्षांचीही भावना आहे. त्या दृष्टिकोनातून मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल रिपोर्ट कार्ड बनविण्याचे कामही त्यांनी हाती घेतले होते.