११ लाख ३६ हजारांचा सायबर फ्रॉड; भांडुपमधील सराईताला गोवा पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 15:17 IST2020-11-04T15:16:08+5:302020-11-04T15:17:25+5:30
तक्रारदाराकडून अली याने व्याजमुक्त कर्ज देण्याच्या बहाण्याने सेवा शुल्क, प्रक्रिया शुल्क, कर कपातीच्या नावाखाली तब्बल ११ लाख ३६ हजार रुपये उकळले. हे पैसे ऑनलाईन हस्तांतरित करून घेतले.

११ लाख ३६ हजारांचा सायबर फ्रॉड; भांडुपमधील सराईताला गोवा पोलिसांकडून अटक
पणजी :गोवा सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी तब्बल ११ लाख ३६ हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणी भांडुप, मुंबई येथील अली उर्फ मोहम्मद मुमताज याला अटक केली. गोवा सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनीमुंबई पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. २० लाख रुपयांचे व्याजमुक्त कर्ज देण्याच्या आमिषाने फसवणूक करण्यात आल्याची तक्रार गोवा पोलिसांकडे आली होती.
तक्रारदाराकडून अली याने व्याजमुक्त कर्ज देण्याच्या बहाण्याने सेवा शुल्क, प्रक्रिया शुल्क, कर कपातीच्या नावाखाली तब्बल ११ लाख ३६ हजार रुपये उकळले. हे पैसे ऑनलाईन हस्तांतरित करून घेतले. तक्रारदाराला आपण फसविले गेल्याची जाणीव होताच त्याने पोलिसांकडे धाव घेतली. या अनुषंगाने सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी तपास सुरू केला असता प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत आढळून आले.
अली याच्याविरुद्ध महाराष्ट्रातही अशाच प्रकारचे गुन्हे नोंद असल्याची माहिती सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांची मदत घेऊन अली याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.