झकपक समारंभाविना इफ्फीचे सूप वाजले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 20:26 IST2018-11-28T20:24:31+5:302018-11-28T20:26:46+5:30
सोहळ्याला बड्या कलाकारांची अनुपस्थिती

झकपक समारंभाविना इफ्फीचे सूप वाजले
पणजी : ना बडे स्टार, ना सेलिब्रेटी, ना दिलखेचक डान्स, संगीताचा रंगारंग समारंभ, अशा निराश करणाऱ्या वातावरणात ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे बुधवारी सूप वाजले. दरवर्षी बडे कलाकार आणि आकर्षक संगीत, डान्सद्वारे इफ्फी प्रतिनिधींचे मनोरंजन करत समारोप समारंभ संपन्न होत असतो. यंदाच्या इफ्फीत त्याचा अभाव जाणवला.
पटकथा लेखक सलीम खान यांना या समारंभात सिनेमा कारकिर्दीत त्यांनी दिलेल्या लक्षणीय कामगिरीसाठी गौरवण्यात आले. हा पुरस्कार घेण्यासाठी तरी ते आणि त्यांचे कुटुंबीय येतील, असे वाटत होते. पण त्यांनीही निराशा केली. खान कुटुंबातील अरबाज खान यांनी वडिलांच्या वतीनं पुरस्कार स्वीकारला आणि सलीम खान यांचा मेसेज वाचून दाखवला.
अनिल कपूर हे एकमेव सेलिब्रेटी कलाकार या समारंभाला उपस्थित होते. त्यांच्या जोडीला कबीर बेदी, डायना पेंटी, रकूल प्रीत, आंचल गुंजाल, मनोज जोशी, मनोज तिवारी हे हजर होते. गायक विपिन अनेजाने आपल्या मखमली आवाजात काही गाणी गायली आणि एक्स वन एक्स या समूहाने डान्स करुन उपस्थितांचे मनोरंजन केले.