देवी लईराईच्या कौलोत्सवाला गर्दी; दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सावधगिरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 08:57 IST2025-05-04T08:56:34+5:302025-05-04T08:57:46+5:30

घरोघरी कळसाचे आगमन

crowd at lairai kaulotsav administration issues precautionary measures in wake of stampede | देवी लईराईच्या कौलोत्सवाला गर्दी; दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सावधगिरी 

देवी लईराईच्या कौलोत्सवाला गर्दी; दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सावधगिरी 

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: शिरगाव येथील देवी  लईराईच्या कौलोत्सवास शनिवारी सायंकाळी सुरुवात झाली असून घरोघरी देवीच्या कळसाचे आगमन झाल्यावर कौलप्रसाद देण्यात येत आहे. आजपासून चार दिवस हा उत्सव होणार आहे. या उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी आहे.

शनिवारी पहाटे भाविकांच्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन सहा जणांचा मृत्यू झाला, तर ५०पेक्षा अधिक भाविक जखमी झाले. त्यामुळे संपूर्ण राज्यात शोक आहे.

शनिवारी सायंकाळी कौलोत्सवास प्रारंभ झाला. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलिस व इतर माध्यमातून त्यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हजारो भाविक भेटी देत आहेत. तसेच घरोघरी देवीच्या कळसाचे आगमन होत आहे. त्या ठिकाणी नातेवाईक व भाविक कौल घेण्यासाठी उपस्थिती लावतात व आपल्या भावी आयुष्यासाठी प्रार्थना करीत असतात. तीन दिवस पुन्हा या ठिकाणी मोठी गर्दी लोटणार असून प्रशासनाने सर्व ती खबरदारी घेतली आहे. भाविकांनीही शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.

२३ चोरटे ताब्यात

लईराई जत्रेत पोलिसांची करडी नजर असून, संपूर्ण दिवसात सुमारे २३ जणांना चोरीचा प्रयत्न करणे, वस्तू हिसकावून घेणे, आदी कारणांस्तव ताब्यात घेण्यात आल्याची माहिती उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिली. गर्दीचा फायदा उठवत असताना पोलिसांनी ड्रोन व इतर माध्यमातून नजर ठेवत ही कारवाई केली आहे. अधीक्षक अक्षत कौशल व इतर पोलिस अधिकारी शिरगावात चोख बंदोबस्त ठेवून आहेत. भाविकांनी, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत सुरळीत देवदर्शन होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

 

Web Title: crowd at lairai kaulotsav administration issues precautionary measures in wake of stampede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.