गुन्हेगारी प्रचंड वाढतेय; मुख्यमंत्री जे सांगतात, ते अर्धसत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 12:57 IST2025-07-01T12:56:46+5:302025-07-01T12:57:41+5:30
सारा गोवा त्यामुळे सुन्न झाला आहे.

गुन्हेगारी प्रचंड वाढतेय; मुख्यमंत्री जे सांगतात, ते अर्धसत्य
गोवा पूर्वीसारखा शांत राहिलेला नाही, इथे गुन्हेगारी वाढतेय, असा अनुभव स्थानिकांना आणि पर्यटकांनाही येत आहे. गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिलेली नाही, असा याचा अर्थ लोकांनी काढावा का? मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या प्रश्नाचे उत्तर आता शोधावे लागेल. मुख्यमंत्र्यांनी गृहखात्याच्या किंवा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेणे गरजेचे आहे. सातत्याने पोलिस प्रमुखांनी राज्यातील पोलिस स्थानकांना अचानक भेटी देणेदेखील गरजेचे आहे. केवळ उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षकांवर विषय सोपवून चालणार नाही. पूर्वीचे दिवस गेले. धारगळ-पेडणे येथे विद्यार्थ्यावर अॅसिड हल्ला होण्याची घटना काल सोमवारी घडली. या थरारक घटनेविषयी पूर्ण राज्यात चिंता व्यक्त होत आहे.
ऋषभ शेट्ये नावाच्या १७ वर्षीय विद्यार्थ्यावर दिवसाढवळ्या अॅसिड फेकले गेले. बसस्थानकावर बसच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यासमोर एक दुचाकीस्वार येऊन थांबतो आणि त्याच्या अंगावर अॅसिड ओतून निघून जातो, हे भयानक आहे. ऋषभ शेट्ये याची अवस्था अत्यंत गंभीर आहे. गोवा कोणत्या दिशेने चाललाय? पूर्वी गोव्यात असे काही घडत नव्हते, अशा प्रतिक्रिया जनसामान्यांतून येत आहेत. एकूणच समाजाने विचार करून कृती करण्याची वेळ आलेली आहे. सर्व बाबतीत सरकारी यंत्रणांनाही दोष देऊन चालणार नाही.
काही दिवसांपूर्वी फोंड्यातून एका उद्योजकाचे अपहरण करण्यात आले होते. त्याला दिवसाढवळ्याच काहीजणांनी कारमध्ये कोंबून नेले. परराज्यात त्याची कशीबशी सुटका झाली. त्या घटनेनेही गोव्यात खळबळ उडाली होती. तो उद्योजक जिवंत सापडला हीच मोठी गोष्ट. अल्पवयीन मुलींचे अपहरण किंवा त्यांच्यावरील लैंगिक अत्याचार, या आता रोजच्याच घटना झाल्या आहेत. बदलत्या गोव्याचा भेसूर चेहरा जगासमोर येऊ लागलाय. मुख्यमंत्री सावंत यांनी यापूर्वी अनेकदा परप्रांतीय मजुरांना दोष दिला आहे. गोव्यात स्थलांतरित होऊन आलेले मजूर बहुतांश गुन्ह्यांमध्ये आढळतात, अशी विधाने यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी केली आहेत. मात्र मुख्यमंत्री जे सांगतात, ते अर्धसत्य आहे.
परप्रांतीय मजुरांव्यतिरिक्त अन्य घटकदेखील गोव्यातील गुन्हेगारी वाढवत आहेत. पोलिसांचे इंटेलिजन्सदेखील प्रभावी करण्याची गरज आहे. पूर्वी खबऱ्या व्यवस्था होती. ती कमकुवत झालेली आहे. गोव्यात ठरावीक क्षेत्रांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्याची गरज आहे. दहा-वीस वर्षांपूर्वी दुचाकीवरून किंवा जीपमधून खूप पोलिस फिरायचे. सायंकाळी किंवा रात्री पोलिसांची गाडी विविध भागांमध्ये एक तरी चक्कर मारत असे. मात्र आता तसे घडत नाही. किनारी भागाचे आमदार मायकल लोबो याबाबत अनेकदा खंत व्यक्त करतात. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी वरवरचे उपाय नको. केवळ परप्रांतीय मजुरांना दोष देऊन सरकारची जबाबदारी संपत नाही.
कॅसिनोंचे पणजीत आगमन झाल्यापासून पणजी व परिसरातही गुन्हे वाढलेत, हे लक्षात घ्यावे लागेल. आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढतेय हा भाग आहेच; पण खून, बलात्कार, घरफोडी, लैंगिक अत्याचारांच्या घटनाही खूप झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बार्देश तालुक्यात तिघा अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराची घटना गाजली. हॉटेलमध्ये नेऊन तिघा मुलींवर बलात्कार करण्यात आला. दोघांना त्या प्रकरणी लगेच अटक झाली. पालकांनीही अधिक काळजी घेण्याची गरज आहेच. सोशल मीडियावर मुली कुणाशी मैत्री करतात आणि कुणाच्या जाळ्यात फसतात यावर पालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. हे काम तरी सरकार करू शकणार नाही.
मुरगाव, बार्देश, सासष्टी, फोंडा या चार तालुक्यांमध्ये अधिकाधिक गुन्हे घडत असतात. मंदिरांमध्येदेखील सराईतपणे चोऱ्या होतात. कधी फंडपेट्या फोडल्या जातात, तर कधी मूर्ती पळवली जाते. वाढत्या बेरोजगारीचे दुष्परिणामही दिसून येत आहेत. अनेक गोमंतकीय युवक ड्रग्जच्या आहारी जाऊ लागले आहेत. हे अधिक धक्कादायक आहे. ऋषभ शेट्ये या युवकावर झालेल्या हल्ल्याचा सर्व थरांतून निषेध व्हायलाच हवा. गुन्हेगाराला लवकर शोधून काढून तुरुंगात डांबावे असे लोकांना वाटत असतानाच काल सायंकाळी पोलिसांनी हल्लेखोराला पकडले. अॅसिड हल्ल्यात ऋषभ ३० टक्के भाजला आहे. प्रेमसंबंधांच्या विषयातून हा हल्ला झाला, हे आता स्पष्ट झाले आहे. प्रेयसीच्या वडिलांनी ऋषभवर प्राणघातक अॅसिड हल्ला केला. हे एक विचित्र प्रकरण आहे. सारा गोवा त्यामुळे सुन्न झाला आहे.