दरड कोसळली; वास्कोहून जाणाऱ्या चार रेल्वे रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 13:14 IST2023-07-27T13:14:01+5:302023-07-27T13:14:46+5:30
तीन रेल्वेचे मार्ग बदलून त्या हुबळी आणि बेळगाव स्थानकावरून ये-जा करणार आहेत.

दरड कोसळली; वास्कोहून जाणाऱ्या चार रेल्वे रद्द
वास्को: कॅसलरॉक ते करंझोळ रेल्वेमार्गावर मंगळवारी (दि.२५) संध्याकाळी मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे वास्को रेल्वेस्थानकावर जाणाऱ्या चार रेल्वे तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर तीन रेल्वेचे मार्ग बदलून त्या हुबळी आणि बेळगाव स्थानकावरून ये-जा करणार आहेत.
मंगळवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास कॅसलरॉक ते करंझोळ रेल्वेमार्गावर मोठी दरड कोसळली. त्यामुळे वास्को रेल्वेस्थानकावर येणाऱ्या व येथून विविध ठिकाणी जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. गुरुवारी (दि. २७) वास्को रेल्वेस्थानकावरून पश्चिम बंगाल, हावडा येथील शालिमार रेल्वेस्थानकावर प्रवाशांना घेऊन निघणारी रेल्वे वास्कोऐवजी हुबळी येथून प्रवाशांना घेऊन निघणार आहे. तसेच गुरुवार व शुक्रवारी वास्कोहून दिल्ली येथील हजरत निझामुद्दीन रेल्वेस्थानकावर जाणारी गोवा एक्स्प्रेस बेळगाव येथून निघणार आहे. दरम्यान, वालांकिणीहून वास्कोला येणारी रेल्वे हुबळी येथे थांबवण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.