गोव्यात इलेक्ट्रॉनिक संगीत नृत्य महोत्सवाच्या आयोजनाविषयी मंत्रिमंडळात मतभिन्नता 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 02:02 PM2017-09-19T14:02:09+5:302017-09-19T14:05:21+5:30

ड्रग्जच्या विक्री व वापराविरूद्ध गोव्यात पोलीस खाते सक्रीय झालेले असताना इलेक्ट्रॉनिक संगीत नृत्य महोत्सव म्हणजेच ईडीएमचे आयोजन गोव्यात करण्याविषयी गोवा मंत्रिमंडळात मतभिन्नता आहे.

Controversy in the Cabinet about the organizing of Electronic Music Dance Festival in Goa | गोव्यात इलेक्ट्रॉनिक संगीत नृत्य महोत्सवाच्या आयोजनाविषयी मंत्रिमंडळात मतभिन्नता 

गोव्यात इलेक्ट्रॉनिक संगीत नृत्य महोत्सवाच्या आयोजनाविषयी मंत्रिमंडळात मतभिन्नता 

Next

पणजी, दि. 19 - ड्रग्जच्या विक्री व वापराविरूद्ध गोव्यात पोलीस खाते सक्रीय झालेले असताना इलेक्ट्रॉनिक संगीत नृत्य महोत्सव म्हणजेच ईडीएमचे आयोजन गोव्यात करण्याविषयी गोवा मंत्रिमंडळात मतभिन्नता आहे. मंत्रिमंडळात यापुढे हा विषय वादाचाही ठरू शकतो. काही आमदार व मंत्र्यांना सनबर्नसारखे ईडीएम गोव्यात व्हायला हवेत असे वाटते. मात्र अशा काही महोत्सवांमध्ये अंमली पदार्थांचा वापर होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने काही मंत्री ईडीएमला विरोध करत आहेत. ईडीएममध्ये जगभरातील लाखो पर्यटक भाग घेतात व जोरदार संगीताच्या तालावर ते अखंडीतपणे नृत्य करतात.

गोव्यातील अंजुणा येथे एका संगीत नृत्य महोत्सवाप्रसंगीच गेल्या महिन्यात ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. यामुळे गोव्याचे जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर यांनी ईडीएमच्या आयोजनाला विरोध केला आहे. मंत्री पालयेकर यांचा शिवोली हा विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे किनारी भागात येतो व काही जगप्रसिद्ध किनारे त्यांच्या मतदारसंघात आहेत. मी माझ्या शिवोली मतदारसंघात तरी ईडीएम होऊ देणार नाही. माझी लढाई ड्रग्ज व्यवसायाविरुद्ध आहे. गोव्याची पिढी अंमली पदार्थांमुळे बदनाम होत आहे, असे मंत्री पालयेकर यांचे म्हणणे आहे.

काही मंत्री व आमदार मात्र ईडीएमच्या आयोजनासाठी आग्रही आहेत. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने ईडीएमसारखे उपक्रम आयोजित करणे ही गोव्याची गरज आहे, असे काही मंत्री व आमदारांचे म्हणणे आहे. ईडीएममध्ये ड्रग्जचा वापर होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी, असे काही मंत्र्यांचे म्हणणे आहे.
पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांचा गोव्यात ईडीएम आयोजित करण्यास विरोध नाही. ड्रग्ज व्यवहारांविना ईडीएम होत असतील तर ते व्हायला हवेत. अंमली पदार्थ व्यवहारांना आपला विरोधच असून कुठेही असे व्यवहार दिसल्यास पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी भूमिका मंत्री आजगावकर मांडत आले आहेत.
कळंगुट हा जगप्रसिद्ध किनारा आमदार मायकल लोबो यांच्या  मतदारसंघात येतो. गोव्यात येणारे  पर्यटक कळंगुटला भेट देऊन जातातच. आमदार लोबो यांचा ईडीएमच्या आयोजनाला पाठींबा आहे. सनबर्नसारखे महोत्सव गोव्यात व्हायला हवेत असे लोबो यांचे मत आहे. येत्या महिन्यापासून गोव्याचा नवा पर्यटन मोसम सुरू होत आहे. ईडीएमचे आयोजन डिसेंबर-जानेवारीत होत असते. यावेळी ईडीएम आयोजन हा मंत्रिमंडळात वादाचा विषय बनेल अशी चिन्हे आतापासूनच दिसतात.

Web Title: Controversy in the Cabinet about the organizing of Electronic Music Dance Festival in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.