congress slams bjp government in goa | कचऱ्याऐवजी तिजोरीच साफ केली; भाजपा सरकारवर काँग्रेसची तोफ
कचऱ्याऐवजी तिजोरीच साफ केली; भाजपा सरकारवर काँग्रेसची तोफ

पणजी : गोवा  सरकारच्या सुमार कामगिरीवर तोफ डागताना प्रदेश काँग्रेसने वेगवेगळ्या निकषांवर सरकार अपयशी ठरल्याबद्दल टीकेची झोड उठविली आहे. 

पत्रकार परिषदेत प्रदेश काँग्रेसचे संवाद विभागप्रमुख ट्रोजन डिमेलो म्हणाले की, ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने गेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात दहा निकष लावून केलेल्या सर्वेक्षणात सरकारची कामगिरी अगदीच सुमार आढळून आलेली आहे. रोजगार संधी, कचरा विल्हेवाट, दर नियंत्रण या बाबतीत सरासरीपेक्षाही बरेच कमी गुण राज्य सरकारला मिळाले आहेत.’ स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत तिजोरी साफ केली. मात्र कचरा काही साफ झाला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचे सोडून आहेत त्याही गमावल्या. खाणी बंद झाल्याने लोकांचा रोजगार गेला. नोटाबंदीमुळे देशभरात नोकऱ्या गेल्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधांच्या बाबतीतही सरकार अपयशी ठरले. हा अहवाल नजरेसमोर ठेवून लोकसभेसाठी आगामी निवडणुकीत दोन्ही जागा तसेच विधानसभेच्या तीन मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीत जनता भाजपला धुडकावून लावील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

पक्षाचे प्रवक्ते अ‍ॅड. रोहित ब्रास डिसा म्हणाले की, ‘या अहवालाबाबत मुळीच प्रश्न उपस्थित करता येणार नाही. कारण शास्रोक्त पद्धतीने तो तयार करण्यात आला आहे. राज्यात भाजप आघाडी सरकार सुशिक्षितांना नोकऱ्या देऊ शकलेले नाही. कचरा विल्हेवाटीच्या प्रश्नावर न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले.’

मुख्यमंत्र्यांच्या विधानाला आक्षेप 
दरम्यान, कारवार येथे निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कन्नडिगांना गोव्यात नोकºया देण्याचे जे कथित विधान केले त्याला काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. डिमेलो यांनी या विधानाला हरकत घेताना ‘गोंय, गोंयकार आणि गोंयकारपण’ याचा उद्घोष करणारे गप्प का असा सवाल केला आहे. पत्रकार परिषदेस अमरनाथ पणजीकर तसेच अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे सचिव शंकर गौडा पाटील हेही उपस्थित होते. 
 


Web Title: congress slams bjp government in goa
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.