“ED, CBI कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही”: रमेश चेन्नीथला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 18:24 IST2025-04-17T18:21:58+5:302025-04-17T18:24:21+5:30
Congress Ramesh Chennithala News: ईडी, सीबाआयच्या कारवायांनी काँग्रेसचे मनोधैर्य तसूभरही खचणार नाही, असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

“ED, CBI कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही”: रमेश चेन्नीथला
Congress Ramesh Chennithala News: केंद्रातील मोदी सरकार ईडी, सीबीआयचा गैरवापर करत विरोधी पक्षांना संपवू पाहात आहे. त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई ही राजकीय हेतूने केलेली आहे. पंतप्रधान मोदी-अमित शाह अशा कारवाया करून काँग्रेस पक्षाला संपवू शकत नाहीत आणि अशा कारवायांनी काँग्रेसचे मनोधैर्य तसूभरही खचणार नाही उलट मजबूतपणे या हुकुमशाहीचा मुकाबला करू, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.
ED च्या गैरवापराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. आंदोलनानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, मोदी सरकारने सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा आम्ही निषेध करतो. जनतेत या कारवाईबद्दल तीव्र रोष आहे. काँग्रेस पक्षाने या दडपशाही विरोधात काल व आज दोन दिवस देशभर आंदोलन केले, महाराष्ट्रातही विविध ठिकाणी आंदोलन करून भाजपा सरकारचा निषेध केला. या सरकार विरोधात यापुढेही काँग्रेस पक्ष मजबुतीने लढा देईल, असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी दिला.
राज्यातील युती सरकारने जनतेचा विश्वासघात केला
राज्यातील युती सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन विसरले असून आता फक्त ५०० रुपयेच दिले जात आहेत. महायुतीने केवळ मतांसाठी योजना आणली होती. महायुती लाडक्या बहिणींची फसवणूक करत आहे, हे काँग्रेसने आधीच सांगितले होते. प्रदेश व जिल्हा स्तरावरील कार्यकारिणीची पुनर्रचना लवकरच केली जाईल आणि महाबळेश्वर येथे काँग्रेस पक्षाचे एक शिबीर आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती रमेश चेन्नीथला यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत व प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या खासदारांची बैठक झाली. संवाद, समन्वय रणनिती यावर या बैठकीत चर्चा झाली तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांवर सभागृहात व सभागृहाबाहेर आवाज उठवणे आणि जनतेचे मुद्दे उपस्थित करण्यावर सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.