भाजपला मदत करणाऱ्या पक्षासोबत युती नाही: काँग्रेस; कायदा-सुव्यवस्था ढासळल्याची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 08:28 IST2025-11-12T08:27:40+5:302025-11-12T08:28:34+5:30
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. येथेही भाजप सरकार मत चोरीसारखे प्रकार करू शकतात, असा दावा माणिकराव ठाकरेंनी केला आहे.

भाजपला मदत करणाऱ्या पक्षासोबत युती नाही: काँग्रेस; कायदा-सुव्यवस्था ढासळल्याची टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'जर एखादा राजकीय पक्ष काँग्रेसवर तसेच पक्षाच्या नेतृत्वावर आरोप करीत असेल तर त्याच्याशी आम्ही युती करू शकत नाही. टीकेच्या स्वरूपावरून अन्य राजकीय पक्षांना, भाजपला मदत करण्याचा त्यांचा हेतू असल्याचेच जाणवते,' असे काँग्रेसचेगोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात अलीकडे घडलेल्या गोष्टी पाहता सरकारला कायदा व सुव्यवस्था राखण्यास पूर्णपणे अपयश आले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, डॉ. अंजली निंबाळकर व अमरनाथ पणजीकर उपस्थित होते.
माणिकराव ठाकरे म्हणाले की, 'जिल्हा पंचायत निवडणुकीत कुणासोबत युती करावी की नाही, यावर निर्णय घेण्यासाठी आम्ही समिती स्थापन केली आहे. त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यानंतरच मान्यता दिली जाईल. आमचा पक्ष हा वेगळ्या विचारधारेचा आहे. भाजपची ताकद वाढवू पाहणारा पक्ष आमचा मित्र कसा असू शकतो? भाजपला पाठिंबा देणाऱ्यांशी युती केली जाणार नाही.
राज्यातील भाजप सरकारला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास पूर्णपणे अपयश आले आहे. कोळसा वाहतूक पूर्णपणे बंद केली जाईल, असे सरकारने सांगितले होते. मात्र पूर्ण बंद सोडाच, त्यावर साधे नियंत्रण आणणेही त्यांना जमलेले नाही. आजकाल सर्रासपणे सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण होते. त्यांना धमकावले जाते. केंद्रातील सरकारप्रमाणेच येथील सरकारसुद्धा लोकांसोबत चुकीचा व्यवहार करीत आहे.
दरम्यान, फोंडा पोटनिवडणुकीबाबत आमचे आमदार, खासदार, इतर नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असेही माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
त्या मंत्र्याला पदावरून हटवा
'सरकारी नोकरी विक्री प्रकरणातील मुख्य संशयित पूजा नाईकने केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. अशा प्रकारे नोकऱ्यांची विक्री करणे चुकीचे आहे. या प्रकरणात जो मंत्री सहभागी असेल त्याला मंत्रिपदावरून हटवावे. राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनीही जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा,' असेही ठाकरे म्हणाले.
निवडणुकीत व्होटचोरीची भीती
'राज्यात लवकरच जिल्हा पंचायत निवडणुका होणार आहेत. येथेही भाजप सरकार मत चोरीसारखे प्रकार करू शकतात. कसल्याही प्रकारची गडबड होऊ नये यासाठी काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांचे त्यावर बारीक लक्ष आहे. जेणेकरून आमच्या उमेदवारांवर त्याचा कुठलाही परिणाम होऊ नये,' असे ठाकरे यांनी सांगितले.