काँग्रेसचे गटाध्यक्ष ‘ब्लॉक’; तिकिटासाठी पत्ते कापले, एकनिष्ठ व तटस्थ न राहणाऱ्यांना हटवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 01:58 PM2021-09-20T13:58:14+5:302021-09-20T13:59:39+5:30

तिकिटांच्या बाबतीत २०१७ ची चूक काँग्रेस पुन्हा करणार नाही चिदंबरम म्हणाले की, काँग्रेस उमेदवारी देण्याच्या बाबतीत २०१७ मधील चूक कोणत्याही परिस्थितीत पुन्हा करणार नाही.

Congress group president Block; those who are not loyal and neutral will be removed | काँग्रेसचे गटाध्यक्ष ‘ब्लॉक’; तिकिटासाठी पत्ते कापले, एकनिष्ठ व तटस्थ न राहणाऱ्यांना हटवणार

काँग्रेसचे गटाध्यक्ष ‘ब्लॉक’; तिकिटासाठी पत्ते कापले, एकनिष्ठ व तटस्थ न राहणाऱ्यांना हटवणार

googlenewsNext

पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरण्यास इच्छुक असलेल्या काहीजणांची गटाध्यक्षपदी वर्णी लावून काँग्रेसने त्यांचे पत्ते कापले. पक्षाचे ज्येष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी गटाध्यक्षांना उमेदवारी मिळणार नाही, असे स्पष्टच सांगितले असून एखादा गटाध्यक्ष पक्षाशी एकनिष्ठ व तटस्थ न राहता एखाद्या विशिष्ट व्यक्तीलाच उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील असेल किंवा पाठिंबा देत असेल तर त्याला गटाध्यक्षपदावरुन हटविले जाईल, असा इशाराही चिदंबरम यांनी दिला आहे. यामुळे काँग्रेसमध्ये तिकिटोच्छुकांमध्ये खळबळ माजली आहे. काँग्रेसने सर्व गट समित्या बरखास्त केल्यानंतर २८ गटाध्यक्ष नव्याने नेमले आहेत. यात काही जुने आणि नवे चेहरे आहेत, जे गेली साडेचार वर्षे आपापल्या मतदारसंघांमध्ये पक्ष तिकीट देईल या इर्ष्येनेच काम करीत होते. या सर्वांचा अपेक्षाभंग झाला आहे.

चिदंबरम हे केवळ गटाध्यक्षांना तिकीट नाहीच, एवढेच सांगून थांबलेले नाहीत तर पक्षाने नियमच केलेला आहे की, गटाध्यक्षांनी व्यक्तिनिष्ठ असू नये, पक्षनिष्ठ असावे. उमेदवारीच्या बाबतीत कोणाच्याही बाजूने कल दाखवू नये तसेच पाठिंबाही दाखवू नये. तटस्थ रहावे, अन्यथा पदावरुन काढून टाकले जाईल. चिदंबरम यांच्या या तंबीने काही गटाध्यक्ष दुखावलेले आहेत. मात्र, उघडपणे बोलण्याची हिंमत दाखवत नाहीत. चाळीसही गटाध्यक्ष निवडीची प्रक्रिया येत्या २५ ते २६ तारीखपर्यंत पूर्ण केली जाईल. 

तिकिटांच्या बाबतीत २०१७ ची चूक काँग्रेस पुन्हा करणार नाही चिदंबरम म्हणाले की, काँग्रेस उमेदवारी देण्याच्या बाबतीत २०१७ मधील चूक कोणत्याही परिस्थितीत पुन्हा करणार नाही. कार्यकर्त्यांना आधी विश्वासात घेणार. ज्या व्यक्तिवर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यालाच तिकीट दिले जाईल. केपेंत बाबू कवळेकर हे काँग्रेसच्या तिकिटावर चारवेळा निवडून आले परंतु त्यांनी केपेंतील मतदारांचा विश्वासघात केला. येत्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना धडा शिकवावा.

‘बाबू कवळकेर यांना २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत केपें मतदारसंघात उमेदवारी दिली ही आमची चूकच होती आणि त्याबद्दल अ. भा. कॉंग्रेस समितीच्यावतीने मी माफी मागतो,’ असे चिदंबरम यांनी काल रविवारी केपे येथे गट समितीच्या बैठकीत बोलताना सांगितले. ‘कवळेकर यांची उमेदवार म्हणून ज्याने कोणी निवड केली ती त्याची मोठी चूक होती,’ असे सांगताना ‘ही चूक पुन: घडणार नाही’, असेही त्यांनी आश्वस्त केले.  कवळेकर हे जुलै २०१९ मध्ये विरोधी पक्षनेते असताना काँग्रेसच्या दहा आमदारांसह फुटून भाजपवासी झाले व त्यांनी उपमुख्यमंत्रीपदही मिळविले.

पक्षाचा निर्णय शिरसावंद्य : वळवईकर 
कुंभारजुवेंचे गटाध्यक्ष विशाल वळवईकर यांना विचारले असता,  मी पक्षाचा निष्ठावान सैनिक आहे.  पक्ष जो निर्णय घेईल तो मला शिरसावंद्य आहे. राज्यात आम्हाला काँग्रेसचे सरकार सत्तेवर आणायचे आहे. लोकांना बदल हवा आहे त्यासाठी पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य आहे. उमेदवारीबाबत गट समितीच्या माध्यमातूच जाणून घेऊन पक्ष काय तो निर्णय घेणार आहे. गटाध्यक्ष म्हणून मी माझी भूमिका तटस्थपणे निभावणार आहे.’

डिचोलीत तिकीट मलाच : राऊत 
डिचोलीत अजून पक्षाने गटाध्यक्ष नेमलेला नाही. डिचोलीतील तिकिटोच्छुक मेघ:श्याम राऊत म्हणाले की, उमेदवारी मलाच मिळेल याबद्दल ठाम विश्वास आहे. येथे माझ्याशिवाय अन्य उमेदवार नाही. मध्यंतरी चिदंबरम यांनी उत्तर गोव्यातील गटाध्यक्षांशी स्वतंत्रपणे चर्चा केली तेव्हा मी त्यांना लोकांचा काँग्रेसवर विश्वास बसायला हवा असेल तर तेच तेच जुने चेहरे न देता नवीन चेहरे द्या. निवडून येण्याची क्षमता हा निकष लावू नका. ऐनवेळी उमेदवार आयात करुन पक्षासाठी एवढी वर्षे काम करणाऱ्यांवर अन्याय करु नका, असे सांगितले आहे. चिदंबरम यांनी उमेदवार निवडीत गटांना विशेष महत्त्व असणार आहे, हे स्पष्ट केले आहे. गटाध्यक्षांनी तटस्थ रहावे किंवा गटाध्यक्षांना उमेदवारी मिळणार नाही, ही त्यांची भूमिका योग्य वाटते.’
 

Web Title: Congress group president Block; those who are not loyal and neutral will be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.