भाजपात गेलेल्या गद्दारांसाठी काँग्रेसचे दरवाजे बंद; पक्ष वाढीवर भर, जनतेचा उदंड प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 08:24 IST2025-10-15T08:24:35+5:302025-10-15T08:24:58+5:30
गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर : पार्से येथे वोट चोरी अभियानसंदर्भात सह्यांच्या मोहिमेत सहभाग

भाजपात गेलेल्या गद्दारांसाठी काँग्रेसचे दरवाजे बंद; पक्ष वाढीवर भर, जनतेचा उदंड प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे :काँग्रेस पक्षाकडे गद्दारी करून भाजप सरकारमध्ये सहभागी झालेल्या गद्दारांना पुन्हा पक्षात सामील करून घेतले जाणार नाही. पक्ष वाढवण्यासाठी इतर पक्षातील कार्यकर्ते, नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल. मात्र, लगेच उमेदवारी देण्याचा विचार होऊ शकत नाही, असे प्रतिपादन गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केले.
व्होट चोरी अभियानासंदर्भात पार्से येथे सह्यांच्या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. सध्या काँग्रेसतर्फे मांद्रे मतदारसंघात गावागावात व्होट चोरीप्रकरणी अभियान जनजागृतीद्वारे सह्यांची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेसाठी गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, काँग्रेसचे नेते बाबी बागकर, प्रवक्ते देवेंद्र प्रभू देसाई, मांद्रे गट काँग्रेस अध्यक्ष नारायण रेडकर व अन्य उपस्थित होते. काँग्रेस नेते बाबी बागकर म्हणाले, जे पक्ष सोडून गेले आहेत, त्यांना काँग्रेस पक्ष कोणत्याही स्थितीत परत उमेदवारी देणार नाही.
'त्या' आमदारांकडून दिशाभूल
काँग्रेसचे जे आमदार निवडून आले ते भाजप सरकारमध्ये सामील झाले. तेथील जनतेचा विकास करण्यासाठी आम्ही गेलो आहोत, असे वक्तव्य करून ते गद्दार लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. त्या गद्दार आमदारांना आता जनताच धडा शिकवेल, असा दावा यावेळी अमित पाटकर यांनी केला.
काँग्रेस सत्तेवर येईल
सध्या राज्यभर व्होट चोरी अभियान चालू आहे आणि जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त करून जे कोणी गद्दार पक्षात येतील, त्यांनी पक्षात अवश्य यावे. पक्षासाठी पाच वर्षे काम करावे, नंतर त्यांचा फेरविचार पक्षाचे नेते करतील, असे पाटकर म्हणाले.
काँग्रेसला मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने काँग्रेस पक्ष सत्तेवर येणार आहे. त्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते तळागाळापर्यंत पोचत असून, उदंड प्रतिसाद मिळत असल्याचा दावा यावेळी बाबी बागकर यांनी केला. राज्यात काँग्रेस पक्षाला मतदारांमधून सकारात्मक कौल मिळत आहे. काँग्रेस सत्तेत आल्यावर सर्वसामान्यांसह महत्वाच्या समस्या सोडविणार असल्याचा विश्वास पार्से येथे वोट चोरी अभियानावेळी गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केला आहे.