किनारे सुरक्षा प्रकरणी पर्यटनमंत्री बाबू आजगांवकरांच्या राजीनाम्याची काँग्रेसकडून मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 09:20 PM2019-10-13T21:20:41+5:302019-10-13T22:35:45+5:30

किनाऱ्यांवर पर्यटकांना सुरक्षा सेवा पुरविण्यास पर्यटन खात्याला अपयश आले असल्याचा आरोप करीत प्रदेश काँग्रेसने पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी राजीनामा द्यावा.

Congress demands for resignation of tourism minister Babu Azgaonkar in coastal security case | किनारे सुरक्षा प्रकरणी पर्यटनमंत्री बाबू आजगांवकरांच्या राजीनाम्याची काँग्रेसकडून मागणी 

किनारे सुरक्षा प्रकरणी पर्यटनमंत्री बाबू आजगांवकरांच्या राजीनाम्याची काँग्रेसकडून मागणी 

Next

पणजी : किनाऱ्यांवर पर्यटकांना सुरक्षा सेवा पुरविण्यास पर्यटन खात्याला अपयश आले असल्याचा आरोप करीत प्रदेश काँग्रेसने पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी राजीनामा द्यावा. तसेच पर्यटन खाते भ्रष्टाचाराचे आगार बनविलेल्या आजगांवकर यांना मुख्यमंत्र्यानी ताबडतोब मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. पर्यटन खात्यातील गैरकारभार एकेक करुन उघडकीस आणण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

प्रसिध्दी पत्रकात प्रवक्त्या स्वाती केरकर म्हणतात की, ‘मागील एका आठवड्यात दोन पर्यटकांना किनाऱ्यांवर दुर्देवी मृत्यू आला. यावरुन सुविधांचा गलथान व भोंगळ कारभार सर्वांसमोर उघड झाला. परंतु पर्यटनमंत्री किंवा सरकारच्या अधिकाऱ्यांनी साधी संवेदनासुद्धा व्यक्त केली नाही. किनारे सुरक्षा व जीवरक्षक कंत्राटदाराला दिलेले १४१ कोटी कुठे गेले या प्रश्नावर मुख्यमंत्री गप्प आहेत. त्यामुळे यात काळेबेरे असल्याचे स्पष्ट केले.

केरकर पुढे म्हणतात की, ‘विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यानी गेल्या विधानसभा सत्रात किनारे सुरक्षा व सफाई कंत्राटात ‘आॅल इज नॉट वेल' असे सांगून विधानसभेचे लक्ष वेधले होते, ते आता खरे ठरले आहे. दोन दिवसांपासून संपावर गेलेल्या दृष्टी लाइफ सेव्हींग कंपनीच्या जीवरक्षकांनी  कंपनीकडुन त्याना मिळणारी अयोग्य वागणुक तसेच त्याना वॉकी टॉकी सारखी उपकरणे सुद्धा देण्यात आली नव्हती असा गौप्यस्फोट केला आहे.

मुख्यमंत्र्याना गोवा हे ‘जलसमाधी स्थळ म्हणून प्रकाशात आणायचे आहे का?, असा सवाल त्यांनी केला. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांचा ‘मिशन कमिशन' हे एकमेव ध्येय असुन, त्याना इतर कशाचेही सोयर सुतक नाही, असा आरोपही केरकर यांनी केला आहे.  पर्यटनमंत्र्यानी आजपावेतो कुटुंबियांसह केलेल्या विदेशवारींची चौकशी करावी. त्यांच्या बरोबर विदेश दौऱ्यावर गेलेले त्यांचे बंधू व भावजय सरकारी नोकर आहेत. डॉ. श्रीकांत आजगावकर व रश्मी आजगावकर यांचा  विदेशवारींचा खर्च कोणी केला याची सरकारने चौकशी केल्यास सगळे उघड होईल, असे त्यांनी म्हटले आहे. 

पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यानी  कसलाही अनुभव नसलेल्या आपल्या भावाची वर्णी गोवा पर्यटन महामंडळ व गोवा फुटबॉल डेव्हलोपमेंट कौन्सिलवर लावली आहे. मुख्यमंत्र्यानी त्वरीत त्याना हटवुन तेथे योग्य व्यक्तिची निवड करावी, अशी मागणीही केरकर यांनी केली आहे. 

Web Title: Congress demands for resignation of tourism minister Babu Azgaonkar in coastal security case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.