अभिनंदन, छडा लागलाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:46 IST2025-11-27T12:45:31+5:302025-11-27T12:46:42+5:30
राज्यात दरोडे, घरफोड्या, चोऱ्या यांचे प्रमाण गंभीर वळणावर पोहोचले आहे.

अभिनंदन, छडा लागलाच!
राज्यात दरोडे, घरफोड्या, चोऱ्या यांचे प्रमाण गंभीर वळणावर पोहोचले आहे. तरी बायणा येथील दरोडा किंवा सांताक्रूझ येथील घरफोडीचा काल छडा लागला ही अभिनंदनीय गोष्ट आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अलीकडेच सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची आल्तिनो-पणजी येथे बैठक घेतली होती. त्या बैठकीत पोलिसांना कडक सूचना करतानाच मुख्यमंत्र्यांनी कान पिळण्याचेही काम केले होते. शिवाय अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश लगेच जारी झाले होते.
मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतलीय हे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिस यंत्रणा त्यामुळे अधिक सक्रिय झाली. त्यामुळेच दरोडे व घरफोड्यांचा छडा लागू शकला असे म्हणावे लागेल. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे. कायदा व सुव्यवस्थेविषयीच्या गंभीर स्थितीबाबत सर्व विरोधी पक्ष टीका करत होते. कारण गुन्हे वाढत असताना पोलिसांच्या तपासकामात मोठीशी प्रगती दिसत नव्हती. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन कानपिचक्या दिल्या हे चांगले केले; मात्र पोलिसांमध्ये पुन्हा शिथिलता येऊ नये. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांना सातत्याने बैठका घ्याव्या लागतील.
केवळ एक दरोडा व एका घरफोडीचा छडा लागला म्हणजे काम संपले असे होऊ शकत नाही. परराज्यांमधील दरोडेखोरांच्या टोळ्या गोव्यात येतात व आरामात माल लुटून रेल्वेमधून पळून जातात. आता सर्व रेल्वेस्थानकांवर पोलिसांना अधिक लक्ष ठेवावे लागेल. गोव्यातील श्रीमंत, पैसेवाले लोक घाबरलेले आहेत. कधी डॉक्टरांचे बंगले लुटले जात आहेत, तर कधी सोनारांना टार्गेट केले जात आहे. कधी दोनापावल येथे बड्या उद्योजकाच्या घरावरही दरोडा पडतो. पोलिस मग 'अहो, ते दरोडेखोर बांगलादेशी होते, ते बांगलादेशात परतले..' अशी फालतू माहिती जाहीर करतात.
पोलिस दलातील अनेकांना गोव्यातील स्थितीबाबत गांभीर्य नाही. अर्थात मुख्यमंत्री सावंत यांनी पोलिसांची बैठक घेऊन ज्या सूचना केल्या, त्या सूचनांचे पालन काही अधिकारी निश्चितच करू लागले आहेत. काही अधिकारी कष्ट घेतात; पण पोलिसांचे एकूण इंटेलिजन्स खराब आहे, असे पूर्वी आढळून आले. सर्व पोलिस स्थानकांना मुख्यमंत्र्यांनी अचानक भेट देण्याची मोहीम हाती घ्यायला हवी. पूर्वकल्पना न देता अचानक कधी सांगे, तर कधी काणकोण, तर कधी वाळपई पोलिस स्थानकाला, तर कधी पेडणे किंवा केपे अशा पद्धतीने सर्व पोलिस स्थानकांना गृहमंत्र्यांनी भेट द्यावीच.
वास्तविक हे काम आयजीपी, डीजीपी, एसपी यांनी करायला हवे; पण ते करत नाहीत. काही आयपीएस अधिकाऱ्यांना गोव्याचे फार काही पडून गेलेय असे वाटत नाही. बायणा येथील सागर नायक यांच्या घरावरील दरोडा जास्त खतरनाक होता. हेल्मेट वगैरे घालून दरोडेखोर आले होते. शिवाय सागर नायक यांना गंभीर जखमी केले होते. या दरोडेखोरांना शोधून काढून ओरिसा येथे त्यांच्या मुसक्या आवळण्याची कामगिरी गोवा पोलिसांनी केली. पोलिसांना याचे श्रेय जातेच. मात्र, म्हापसा येथील एका डॉक्टरच्या बंगल्यावरील दरोडा प्रकरणातील सर्व दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना अजून यश आलेले नाही.
चावडी काणकोण येथे दोन दिवसांपूर्वीच चोरट्यांच्या एका टोळीने सोनाराला लुटण्याचा प्रयत्न केला. शिवाय पोलिसांवरच दगडफेक करून चोरटे पळाले. त्यांचाही शोध घ्यावा लागेल. पोलिस स्थानकांवरील पोलिस निरीक्षकांच्या सातत्याने बदल्या व्हायला हव्यात. काही जणांना किनारी भागातीलच पोलिस स्थानके आवडतात. काही जणांना परराज्यांतील वाहने अडवून फक्त त्यांच्याकडून अर्थप्राप्ती करण्याचेच काम आवडते. वारंवार गोव्यात पर्यटकांची वाहने अडवण्याचे कारणच नाही. रात्री उशिरापर्यंत थांबून गुन्हेगारांची वाहने अडवायला हवीत. पोलिसांकडे डेटा असायला हवा, माहिती असायला हवी. उगाच नाकाबंदीच्या नावाखाली प्रत्येक वाहन थांबवून स्थानिकांची सतावणूक करू नये.
परप्रांतीय मजुरांची संख्या तिसवाडी, बार्देश, सासष्टी, मुरगावमध्ये वाढतेय. किनारपट्टीत तर बहुतांश परप्रांतीय कामगार आहेत. काही जण बोगस आधारकार्ड घेऊन आलेले आहेत. अलीकडेच एकाला पकडण्यात आले. कळंगुटचे आमदार मायकल लोबो अनेकदा मीडियाला सांगतात की, पोलिसांमधील अनेकजण व्यवस्थित काम करत नाहीत. शंक, हॉटेल्स, ट्रॉलर्स अशा ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची पार्श्वभूमी तपासली जात नाही. सुरक्षा रक्षक म्हणून अनेक नेपाळी गोव्यात काम करतात. त्यांची सगळी माहिती पोलिसांनी ठेवावी. शिवाय मध्यरात्रीनंतर विशेषतः एक ते चार या वेळेत गोव्यात सगळीकडे पोलिसांची गस्त वाढवण्याचे काम करावेच लागेल.