टेक्नोसेव्ही विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 11:35 IST2026-02-11T11:34:16+5:302026-02-11T11:35:16+5:30
या कार्यक्रमाला मंत्री सुभाष शिरोडकर हे उपस्थित होते.

टेक्नोसेव्ही विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स व एसटीईएम (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग व मॅथेमॅटिक्स) शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्यूरियस माइंड्स या संस्थेच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला मंत्री सुभाष शिरोडकर हे उपस्थित होते.
राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कोर्डिंग, रोबोटिक्स, गेमिंग आणि एसटीईएम विषयक विविध स्पर्धामध्ये उत्कृष्ट यश संपादन करून राज्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री म्हणाले, 'या विद्यार्थ्यांनी कल्पकता, चिकाटी आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर विविध स्पर्धामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत राज्याला अभिमान वाटावा असे यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांच्या या कल्पकतेमुळे राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमात मंत्री सुभाष शिरोडकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. ते म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात कोडिंग, रोबोटिक्स आणि एसटीईएम शिक्षण महत्त्वाचे असून भविष्यातील संधींसाठी ही कौशल्ये विद्यार्थ्यांना सक्षम बनवतात. राज्यातील विद्यार्थी या क्षेत्रात आघाडी घेत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.'
यावेळी क्यूरियस माइंड्स संस्थेच्या कार्याचेही विशेष कौतुक करण्यात आले. मंत्री शिरोडकर यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यामध्ये संस्थेचा मोलाचा वाटा आहे. अशा उपक्रमांमुळे राज्यातील तरुण पिढी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला.