लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे दिल्ली भेटीवरून काल मंगळवारी गोव्यात परतले. वीजमंत्री सुदिन ढवळीकर हेही दिल्लीचे आपले काम फत्ते करून गोव्यात काल रात्रीच परतले. आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हेही मुंबई व अन्यत्र जाऊन पुन्हा मंगळवारी गोव्यात दाखल झाले. मंत्रिमंडळाची आज, बुधवारी बैठक होणार होती. पण ती रद्द झाली आहे. मंत्रिमंडळाची आजची बैठक पुढे ढकलण्यामागील कारण अनेक मंत्र्यांना कळालेले नाही.
गोवा मंत्रिमंडळाची फेरररचना पुढील महिन्याभरात होऊ शकते, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून मिळाली. मुख्यमंत्री सावंत यांनी मात्र त्याविषयी कोणतीच माहिती मीडियाला दिलेली नाही. मंत्रिमंडळाची फेररचना होणार याची कल्पना अनेक मंत्री व आमदारांना कल्पना आली आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या हालचाली सुरू आहेत. वीज मंत्री सुदिन ढवळीकर हे मंगळवारी दिवसभर दिल्लीत होते. आपल्या गाठीभेटी स्वतंत्रपणे आटोपून ते रात्री आठच्या सुमारास गोव्यात परतले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या दिल्ली भेटीवेळी अनेक गाठीभेटी घेतल्या. मात्र, कोणती राजकीय चर्चा झाली ते कळत नाही. सभापती रमेश तवडकर यांनीही दिल्ली भेट आटोपली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासोबत मुख्यमंत्री सावंत व सभापती तवडकर यांनी दिल्लीतच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत होते. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत सोहळ्यासाठी विविध नेते दिल्लीत होते. मुख्यमंत्री सावंत व इतरांनी फडणवीस यांना भेटून महाराष्ट्रातील यशाबाबत आनंद व्यक्त केला.
मुख्यमंत्री सावंत हे बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक घेणार होते. पण अचानक ती बैठक रद्द झाली आहे. बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे मंत्र्यांना कळविण्यात आले. यावेळी मंत्री विश्वजित राणे हेही बैठकीत सहभागी होणार होते.
मंत्री राणे हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या कामानिमित्ताने मध्यंतरी मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होऊ शकले नव्हते. गेले दोन दिवस राणे हेही मुंबई व अन्य ठिकाणी होते. त्यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. भाजपच्या काही केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात राणे आहेत. मंत्रिमंडळाची फेररचना करण्यापूर्वी राणे यांनाही विश्वासात घेतले जाईल, असे पक्ष सुत्रांनी सांगितले.
तूर्त राजकीय निर्णय नाही : सावंत
मुख्यमंत्री सावंत यांना 'लोकमत'ने रात्री विचारले असता ते म्हणाले की, 'दिल्लीत आपण अनेकांना भेटलो तरी, राजकीय चर्चा झाली नाही. गोव्यातील मंत्रिमंडळ फेररचनेविषयी चर्चा झाली नाही. सध्या महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या कामातच ज्येष्ठ नेते व्यस्त आहेत. त्यामुळे गोव्याविषयी चर्चा किंवा काही निर्णय झालेला नाही.'
वादांवर तोडगा हवा
भाजपचे केंद्रीय नेते सध्या महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत व्यस्त आहेत. नंतर पुढील महिन्याभरात मंत्रिमंडळ फेररचनेविषयी निर्णय होणार आहे. मंत्री गोविंद गावडे व सभापती तवडकर यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे हे करत आहेत. अजून वाद मिटलेला नाही. मंत्रिमंडळ फेररचनेवेळी काही मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात तर काहींना वजनदार खाती मिळू शकतात.
मुख्यमंत्री तणावमुक्त
दरम्यान, गोव्यात विविध स्वरुपाचे वाद गाजले. नोकऱ्यांच्या विषयापासून अन्य विषय दिल्लीपर्यंत पोहचले. पण, मुख्यमंत्री सावंत हे मात्र पूर्णपणे तणावमुक्त आहेत, असे त्यांच्याशी संवाद साधणाऱ्या प्रत्येकास आढळून आले. मुख्यमंत्र्यांनी कोणतेही टेन्शन घेतलेले नाही. त्यांचे पदही अबाधित राहिल, असे भाजपच्या काही जबाबदार नेत्यांनी 'लोकमत'ला सांगितले. गोव्यात नेतृत्व बदल होणार नाही हे दिल्लीतील काही नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याची माहिती मिळते.