पणजी : जिंगल बेलच्या घोषात कॅरोल गाणी, मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा देत आणि अपूर्व उत्साहात गोव्यात मंगळवारी नाताळ सणाला आरंभ झाला. ख्रिस्ती धर्मियांसाठी हा सर्वात मोठा सण असून गोव्यातील हिंदू बांधवांनीही नाताळाचा आनंद लुटला. शांततेचा व एकात्मतेचा संदेश घेऊन सांताक्लॉज दाखल झाला. येशू ख्रिस्ताच्या जन्मसोहळ्य़ाने नाताळ सुरू झाला.नाताळ सणानिमित्त गोव्यात मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल झालेले आहेत. पुढील काही दिवस नाताळ व नववर्षाचेच वातावरण गोव्यात असेल. गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांनी आल्तिनो येथील त्यांच्या पॅलेसवर येत्या 28 रोजी राज्यातील महनीय व्यक्तींसाठी खास सोहळ्य़ाचे आयोजन केले आहे. या पॅलेससह गोवाभरातील ख्रिस्ती धर्मियांच्या घरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.गोमंतकीयांनी नाताळानिमित्त एकमेकाला मेरी ख्रिसमस व हॅपी न्यू इयर अशा शुभेच्छा देण्यास मंगळवारी आरंभ झाला. एकमेकांना भेटवस्तूही दिल्या जात आहेत. ख्रिस्ती बांधवांनी नाताळानिमित्त बरेच आणि विविध खाद्यपदार्थ तयार केले आहेत. एकमेकांच्या घरी हे पदार्थ वितरित करण्यात आले. नाताळानिमित्त मंगळवारी सरकारी सुट्टीच होती. पुढील काही दिवस नाताळानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम व स्पर्धा होणार आहेत. युरोपसह जगाच्या विविध भागांमध्ये व देशात मुंबईसह अन्य ठिकाणी बरेच गोमंतकीय स्थायिक झालेले आहेत. यातील 90 टक्के गोमंतकीय नाताळाचा सहकुटूंब आनंद लुटण्यासाठी गोव्यात परतले आहेत. पणजीतील चर्चसह राज्यातील सगळ्य़ा पांढ-याशुभ्र चर्च इमारतींवर खूपच सुंदर व देखणी अशी रोषणाई करण्यात आली आहे. तिथे छायाचित्रे टीपण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी सायंकाळी व रात्री दिसून येते.
गोव्यात नाताळ साजरा, गोमंतकीयांत अपूर्व उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 19:09 IST