“मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलीला परत आणण्यासाठी कृपया मदत करा”; एका मातेची आर्त हाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 08:20 IST2025-08-12T08:20:27+5:302025-08-12T08:20:33+5:30
बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या आईने फोडला टाहो

“मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलीला परत आणण्यासाठी कृपया मदत करा”; एका मातेची आर्त हाक
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : मुख्यमंत्री साहेब माझी मुलगी म्हणजे माझे सर्वस्व होती. ती अचानक बेपत्ता झाली आहे. कृपया तुमच्या पोलिसाकरवी माझ्या मुलीला परत आणण्यासाठी मदत करा, असा टाहो एका मातेने सोमवारी फोंडा येथील क्रांती मैदानावर फोडला.
सविस्तर वृत्तानुसार, शिरोडा येथे राहणाऱ्या एका परप्रांतीय महिलेने फोंडा पोलीस स्थानकात तिची अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीनुसार, मंगळवार दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या दरम्यान तिच्या मुलीचे अपहरण करण्यात आलेले आहे. संशयित म्हणून तिने शांतीलाल डांगी रतन पटेल (सध्या मागच्या काही रा. फर्मागुडी, मूळ रा. राजस्थान) याचे नाव दिले आहे. त्या महिलेच्या म्हणण्यानुसार, दिवसापासून ती एफआयआर कॉपी, फोंडा पोलिसांकडे मागत आहे. परंतु तिला एफआयआर कॉपी देण्यात आलेली नाही.
पोलिसांकडून कोणतेच सहकार्य मिळत नसल्याचा आरोपही तिने केला आहे. सोमवारी ती पुन्हा एकदा पोलिस स्टेशनमध्ये आली होती व या संदर्भात तिने चौकशी केली होती. शेवटी निराशा हाती लागल्यानंतर तिने क्रांती मैदानावर एकच टाहो फोडला. त्या महिलेने सांगितले, की पोलिसांवरील आपला विश्वास उडत चाललेला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करावी व आपली मुलगी शोधून काढण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकावा.
शक्य तेवढ्या लवकर न्याय मिळवून देऊ : पोलिस
दरम्यान, पोलिस सहकार्य करत नसल्याचा या महिलेचा आरोप पोलिसांनी फेटाळून लावला आहे. यासंबंधी पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमच्यापरिने आम्ही सर्व बाजूने तपास सुरू केला आहे. संशयित म्हणून ज्याचे नाव देण्यात आले त्यांचा याप्रकरणात कितपात सहभाग आहे, याचासुद्धा तपास चालू झाला आहे. त्या मुलीच्या आईला शक्य तेवढ्या लवकर न्याय मिळवून देण्यासाठी फोंडा पोलिस निश्चितच प्रयत्न करत आहेत. याकामी तिला हवे ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत.