काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदल अटळ; दिल्लीत वेणुगोपालांनी घेतली बैठक, माणिकराव ठाकरेही उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:57 IST2025-10-09T09:56:42+5:302025-10-09T09:57:14+5:30
दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेसच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदल अटळ; दिल्लीत वेणुगोपालांनी घेतली बैठक, माणिकराव ठाकरेही उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदल अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत. काल, बुधवारी सकाळी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गोव्यातील काँग्रेसच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
बैठकीला पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रभारी सचिव अंजली निंबाळकर, खासदार विरियातो फर्नाडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लस फेरेरा, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, अ. भा. काँग्रेस समितीचे कायम निमंत्रित गिरीश चोडणकर आदी उपस्थित होते. येत्या डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायतींच्या निवडणुका होणार असून, २०२७ ची विधानसभा निवडणूकही जेमतेम पाचशे दिवसांवर आली आहे.
नवीन प्रदेशाध्यक्ष लवकरच देण्याची तयारी केंद्रीय नेत्यांनी चालवली आहे. भाजपने दामू नाईक यांच्या रूपाने ओबीसी प्रदेशाध्यक्ष दिल्याने काँग्रेसनेही ओबीसीलाच हे पद देण्याचे निश्चित केल्याची माहिती मिळते.
वेणूगोपाल यांनी गोव्यातील ताज्या राजकीय स्थितीचा आढावा वरील सर्वांकडून घेतला. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी नुकताच गोवा दौरा केला. या दौऱ्यावेळी त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेस व भाजपची छुपी युती असल्याचा तसेच दोन्ही पक्षांनी गेल्या तेरा वर्षात भ्रष्टाचार माजवल्याचा तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने खाणी चालवतात वगैरे आरोप त्यांनी केले. हा विषयही बैठकीत चर्चेला आला.
गटबाजी नाही : निंबाळकर
दरम्यान, काँग्रेसच्या प्रभारी सचिव अंजली निंबाळकर यांची पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांच्याशी 'वन टू वन' चर्चा झाली. तया चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, 'केंद्रीय नेतृत्वाने गोव्याच्या नेत्यांकडे योग्य ते लक्ष दिल्याने मी समाधानी आहे.' काँग्रेसमध्ये अमित पाटकर व गिरीश चोडणकर यांचे दोन गट आहेत का? असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, 'पक्षात कोणतीही गटबाजी नाही.'