मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनेच खांदेपालट; दामू नाईक-बी. एल. संतोष यांची चार तास चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 07:32 IST2025-06-07T07:29:37+5:302025-06-07T07:32:31+5:30

पुढील पंधरवड्यात दिल्लीत चर्चा होऊ शकते. मुख्यमंत्र्यांना त्यासाठी दिल्लीला बोलवून घेतले जाईल, अशी माहिती मिळाली.

change in cabinet will made with the approval of the cm and damu naik b l santosh had a four hour discussion | मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनेच खांदेपालट; दामू नाईक-बी. एल. संतोष यांची चार तास चर्चा

मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनेच खांदेपालट; दामू नाईक-बी. एल. संतोष यांची चार तास चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याच्या धावत्या भेटीवर आलेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भेट घेऊन पक्ष संघटना तसेच सरकारमध्ये जे बदल पक्षाला हवे आहेत, त्याविषयी चर्चा केली. संतोष हे आपला अहवाल श्रेष्ठींना सादर करणार असून लवकरच मंत्रिमंडळात घाऊक बदल अपेक्षित आहेत.

मंत्रिमंडळ फेरबदल हे अखेर मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करून केले जात असतात. त्यामुळे पुढील पंधरवड्यात दिल्लीत चर्चा होऊ शकते. मुख्यमंत्र्यांना त्यासाठी दिल्लीला बोलवून घेतले जाईल, अशी माहिती मिळाली.

दक्षिण गोव्यातील एका हॉटेलमध्ये तब्बल चार तास दामू त्यांच्यासोबत होते. दोघांनी एकत्रच रात्रीचे जेवणही घेतले. संघटनात्मक, राजकीय आणि सामाजिक विषयावर दामू यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून सरकारमध्ये तसेच संघटनात्मक पातळीवरही लवकरच फेरबदल अपेक्षित आहेत. 

प्रदेशाध्यक्षांकडून माहिती घेऊन बी. एल. संतोष आज, शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता परतले. ते आपला अहवाल श्रेष्ठींना सादर करणार आहेत. गोविंद गावडे यांना डच्चू देण्याबरोबरच काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. गावडे यांनी गेल्या पंधरवड्यात मुख्यमंत्र्यांकडील आदिवासी कल्याण खात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर खळबळ माजली होती. गावडे यांनी नेमके काय वक्तव्य केले याची माहिती केंद्रीय नेत्यांनीही घेतली होती.

लोबो दिल्लीत, परंतु वैयक्तिक कामासाठी

आमदार मायकल लोबो गुरुवारी रात्रीच दिल्लीत डेरेदाखल झाल्याने चर्चेला ऊत आला. मंत्रिमंडळात आपले स्थान निश्चित करण्यासाठी त्यांनी दिल्ली गाठल्याचे बोलले जात होते. परंतु 'लोकमत'ने त्यांच्याशी संपर्क साधला असता 'मी वैयक्तिक कामासाठी दिल्लीत आलोय. माझ्या या दिल्ली भेटीशी राजकारणाचा कोणताही संबंध नाही', असे लोबो म्हणाले.

दामू म्हणतात, 'वेट अॅण्ड वॉच'

दामू यांच्याशी संपर्क साधला असता 'वेट अॅण्ड वॉच', एवढेच ते म्हणाले. बी. एल संतोष यांच्याशी संघटनात्मक, राजकीय आणि सामाजिक विषयावर आपली सविस्तर चर्चा झालेली आहे. त्यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल माहिती दिली असून मी सध्या काहीही बोलू इच्छित नाही. योग्य वेळी काय ते होईल, असे दामू म्हणाले.

गावकरना सभापतिपद?

एका अंदाजानुसार, मंत्रिमंडळ फेरबदलात पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना डच्चू दिल्यास आमदार दिगंबर कामत यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते. मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या जागी मुरगावचे संकल्प आमोणकर यांना मंत्री म्हणून संधी दिली जाऊ शकते. तशी चर्चा पक्षात सुरू आहे. गणेश गावकर यांना सभापतीपद दिले जाण्याची शक्यता आहे. सध्या मंत्रिमंडळात असलेल्या सर्व मंत्र्यांची खाती बदलली जातील.
 

Web Title: change in cabinet will made with the approval of the cm and damu naik b l santosh had a four hour discussion