केंद्राकडून राज्याला सर्वतोपरी सहकार्य : रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 07:23 IST2025-10-10T07:23:10+5:302025-10-10T07:23:10+5:30
पर्पल महोत्सवाच्या माध्यमातून राज्य सरकारचे काम कौतुकास्पद

केंद्राकडून राज्याला सर्वतोपरी सहकार्य : रामदास आठवले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली भाजप सरकार चांगले काम करत आहे. केंद्र सरकारचा त्यांना पाठिंबा आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे राज्य सरकारला जे सहकार्य हवे असेल ते आम्ही द्यायला तयार आहोत, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी पणजीत पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
मंत्री आठवले म्हणाले, आमच्या मंत्रालयातर्फे नशा मुक्त केंद्र, वृद्धाश्रम तसेच इतर काही सवलती घ्यायच्या असेल तर खात्याकडून सर्व सहकार्य केले जाते. गोवा राज्य सरकारने अशा प्रकारची मागणी केल्यास आम्ही त्यांना नक्की सहकार्य करणार. आता पर्पल महोत्सवाच्या माध्यामातून राज्य सरकारने केंद्र सरकारला सहकार्य केले आहे. हा अशा प्रकाराचा मोठा उत्सव दिव्यांगांसाठी घडवून आणून गोवा राज्य सरकार चांगले काम करत आहे.
दिव्यांग लोकांचा विकास गरजेचा
मंत्री आठवले म्हणाले की, पर्पल महोत्सवाच्या माध्यमातून देश विदेशातील मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी राज्यात आले आहेत. त्यांची योग्य अशी सोय राज्य सरकारने केली आहे. चांगली सुरक्षा त्यांना देण्यात आली आहे. याचे श्रेय हे डॉ. प्रमोद सावंत यांना जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साकारला आहे. विकसित भारत २०४७ होण्यासाठी देशातील दिव्यांग लोकांचा विकास गरजेचा आहे. देशात चार कोटींच्या आसपास दिव्यांग लोक आहेत. त्यांना सर्व सहकार्य सरकारकडून केले जात आहे. तर केंद्राकडून राज्य सरकारला होणाऱ्या मदतीबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले म्हणाले की, आम्ही गोव्यातील भाजप सरकारला वेळोवेळी सहकार्य करत असतो.
समाजाच्या लोकांवर अन्याय होऊ देणार नाही
सरन्यायाधीश बी. आर. गवई हे दलित असल्यानेच त्यांच्यावर सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न झाला आहे. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद होऊन कारवाई व्हावी. कुठल्याही दलितांवर अशा प्रकारचा हल्ला करणे म्हणजे गुन्हा आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी, असा प्रयत्न मी करीन, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.