पणजीत महापौर, नगरसेवकांची ‘गांधीगिरी’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 01:06 PM2018-10-02T13:06:27+5:302018-10-02T13:07:43+5:30

प्लास्टिकबंदी लागू : ग्राहकांच्या हाती दिल्या कागदी पिशव्या

CCP mayor, commissioner campaigning regarding plastic ban in Panjim Market | पणजीत महापौर, नगरसेवकांची ‘गांधीगिरी’ 

पणजीत महापौर, नगरसेवकांची ‘गांधीगिरी’ 

Next

पणजी : गोव्याच्या या राजधानी शहरात महापालिकेने मंगळवारपासून प्लास्टिकबंदी लागू केली आहे. महापौर, उपमहापौर, मनपा आयुक्त तसेच नगरसेवकांनी सकाळी बाजारपेठेत फिरुन दुकानदार तसेच फळे, भाजी विक्रेते आणि ग्राहकांमध्ये जागृती केली. बाजारात प्लास्टिक पिशव्या घेऊन येणाऱ्या ग्राहकांच्या हातात कापडी तसेच कागदी पिशव्या देऊन ‘गांधीगिरी’ केली. उद्यापासून कडक अंमलबजावणी होणार असून कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या वापरताना दिसल्यास 5 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. 

महापालिका आयुक्त अजित रॉय यांनी पाच निरीक्षकांचे विशेष पथक स्थापन केले असून कारवाईसाठी पोलिसांचीही मदत घेतली जाईल. 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिक पिशव्याही वापरता येणार नाहीत. केवळ कागदी अथवा कापडी पिशव्या वापराव्या लागतील. दुकानदारांबरोबरच ग्राहकांनाही कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कप वापरल्यास दंड ठोठावला जाईल. 
गांधी जयंतीचे औचित्य साधून आज २ ऑक्टोबरपासून शहरात प्लास्टिकबंदी पूर्णपणे अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यंतरी काही नगरसेवकांनी ही बंदी शिथिल केली जावी, अशी मागणी केली परंतु आयुक्त अजित रॉय ठाम राहिले. त्यामुळे नगरसेवकांनाही आपापल्या प्रभागांमध्ये फिरुन लोकांमध्ये जागृती करावी लागली. 

महापौर विठ्ठल चोपडेकर यांच्या म्हणण्यानुसार प्लास्टिक कचऱ्याचा फार मोठा उपद्रव महापालिकेला झालेला आहे. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या तसेच अन्य प्लास्टिक साहित्यामुळे पावसाळ्यात गटारे तुंबतात आणि पाणी रस्त्यावर येऊन पूरस्थिती निर्माण होते. पर्यावरणाला प्लास्टिक कचरा हानिकारक आहे. त्यामुळे मनपाने हे कडक पाऊल उचलले आहे. दरम्यान, शहरातील पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याचे काम त्वरित सुरु होणार आहे. त्यासाठीही महापालिका निरीक्षकांबरोबरच दोन पोलिस हेड कॉन्स्टेबल्स तसेच एक पोलिस शिपाई यांचा समावेश असलेले पथक स्थापन करण्यात आले आहे. 
 

Web Title: CCP mayor, commissioner campaigning regarding plastic ban in Panjim Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.