जातनिहाय गणना २०२६ पर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 13:56 IST2025-04-18T13:55:51+5:302025-04-18T13:56:36+5:30
देशभरात जनगणना होईल, तेव्हाच आपोआप गोव्यातही ओबीसींची जातनिहाय जनगणना होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

जातनिहाय गणना २०२६ पर्यंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भंडारी समाजाच्या माजी मंत्री, माजी आमदारांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन जातनिहाय गणनेसह विविध मागण्या मांडल्या. यावेळी देशभरात जनगणना होईल, तेव्हाच आपोआप गोव्यातही ओबीसींची जातनिहाय जनगणना होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हेही उपस्थित होते. शिष्टमंडळात माजी मंत्री दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर, मिलिंद नाईक, जयेश साळगावकर, माजी आमदार किरण कांदोळकर, दयानंद सोपटे आदी उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भंडारी समाजाची जनगणना तसेच आरक्षण व इतर प्रश्नांबरोबरच हरवळे येथील रुद्रेश्वर देवस्थानवर सरकारने जो प्रशासन नेमला आहे, त्याबाबतही शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून तोडगा काढावा व देवस्थानवरील प्रशासक राजवट दूर करावी, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी यात आपण लक्ष घालतो, असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, किरण कांदोळकर यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार भंडारी समाज आपल्या लोकांची स्वतंत्र गणना करणार असून त्याला सरकारची कोणतीही हरकत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
समाजाची एकी हवी
भंडारी समाजाचे एकत्रीकरण हा उद्देश आहे. भंडारी समाजाची जनगणना व आरक्षण विषय घेऊन केवळ भाजपचेच माजी मंत्री, आमदार नव्हे तर इतर पक्षांचे नेतेही कार्यरत आहेत. काँग्रेसचे माजी आमदार श्याम सातार्डेकर, गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर हेही या चळवळीत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
मतभेद मिटवण्याची मागणी
भंडारी समाजामध्ये देवानंद नाईक व उपेंद्र गावकर असे दोन गट पडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही गटांना बोलावून त्यांच्यातील मतभेद मिटवून समाज एकसंध करावा, अशी मागणीही करण्यात आली. यातही मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे, असे सूत्रांनी सांगितले.