कार्निव्हलच्या धुमधडाक्यात अजूनही केपे गावात जुना 'इंत्रुज'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 18:34 IST2018-02-09T18:31:31+5:302018-02-09T18:34:23+5:30
गोव्यातील कार्निव्हल म्हणजे खा, प्या आणि मजा करा, अशाच स्वरुपाचा असल्याचा सर्वसाधारण समज आहे. मात्र प्रत्यक्षात गोव्यात हा सण पारंपरिक ‘इंत्रुज’ म्हणून साजरा केला जायचा.

कार्निव्हलच्या धुमधडाक्यात अजूनही केपे गावात जुना 'इंत्रुज'
सुशांत कुंकळयेकर/ मडगाव: गोव्यातील कार्निव्हल म्हणजे खा, प्या आणि मजा करा, अशाच स्वरुपाचा असल्याचा सर्वसाधारण समज आहे. मात्र प्रत्यक्षात गोव्यात हा सण पारंपरिक ‘इंत्रुज’ म्हणून साजरा केला जायचा. कष्टकरी समाज त्यात उत्साहाने सामील व्हायचा. मात्र शहरीकरणाने या जुन्या इंत्रुजाला मागे टाकून कार्निव्हल आत्मसात केला तरीही मडगावपासून 17 कि.मी. अंतरावर असलेल्या आंबावली-केपे येथे मात्र हा जुना इंत्रुज अजूनही सांभाळून ठेवला आहे.
केपेतील आंबावली हा गाव ख्रिस्ती आदिवासी लोकांची वस्ती असलेला. इंत्रुज हा या गावातील एक प्रमुख उत्सव. या इंत्रुजाच्या आदल्या रविवारी या गावातील कपेलाचे फेस्त व्हायचे आणि त्यानंतर सात दिवसांनी म्हणजे पुढच्या रविवारपासून सुरु होणा-या इंत्रुजात हा संपूर्ण गाव बुडून जायचा. रंगीबेरंगी कपड्यातील मेळ गावात सगळीकडे फिरायचे. मात्र 1994-95 या दरम्यान या गावात एक वेगळेच वारे वाहू लागले. गावच्या कपेलाच्या पाद्रीने एक फतवा काढला. इंत्रुजातील कर्मकांडे म्हणजे सैतानाला आकर्षित करणारी कर्मकांडे. हळूहळू गावातून या इंत्रुजाला विरोध व्हायला लागला आणि शेवटी 1997 साली तो कायमचा बंद झाला.
या घटनेच्या तब्बल 11 वर्षानंतर ही जुनी परंपरा पुन्हा सुरू करणारे केपेतील अॅड. जॉन फर्नाडिस हे सांगत होते. जॉन म्हणाले, माझ्या लहानपणी आमच्या येथे तीन इंत्रुज खेळले जायचे. पहिल्या दिवशी एक, दुस-या दिवशी दुसरा तर तिस-या दिवशी तिसरा. हा तिसरा इंत्रुज मोठा असायचा. त्या दिवशी सकाळी वाड्यावरील मेळ वाड्यावरील सर्व घरात जावून नाचायचा तर संध्याकाळी इतर वाड्यावरील मुख्य ठिकाणी जाऊन नाचायचा. धोल, घुमट, शामेळ, कांसाळे आदी वाद्यांचा अगदी झिंगझिंगाट व्हायचा. या सर्व घटना माझ्या मनावर कोरल्या होत्या. आमचा पारंपरिक इंत्रुज बंद झाल्यानंतर आम्ही संस्कृतीपासून तुटलो जात आहोत अशी भावना माझ्या मनात तयार होऊ लागली होती. त्यामुळे शेवटी गावातील सवंगड्यांना एकत्र करुन एक दिवसापुरता का होईना पण आमचा पारंपरिक इंत्रुज जीवंत करण्याचे आम्ही ठरविले. 2008 पासून आम्ही हा इंत्रुज पुनर्जिवित केला.
आता इंत्रुजाच्या मंगळवारी आंबावलीतील हे युवक रंगबिरंगी कपडे धारण करुन आणि डोक्याला इंत्रुजाच्या टोप्या चढवून पूर्वीच्याच प्रमाणे गावात मेळ सादर करत आहेत. जॉन म्हणतात, सुरुवातीला आम्हाला हा उत्सव पूर्वीच्या जोमाने सुरु करण्यास अडचणी आल्या. मुख्य अडचण होती ती म्हणजे, जुनी वाद्ये कशी वाजवतात हे नवीन मुलांना माहीतच नव्हते. कारण त्यांनी कधी ही वाद्ये ऐकलीच नाहीत. त्याशिवाय दुसरी मोठी अडचण होती ती म्हणजे जुन्या पारंपरिक गीतांची. मात्र या गीतांचे संकलन करण्यात जॉनने जी हुशारी दाखविली होती ती यावेळी कामाला आली.
जॉन म्हणतात, आमचा इंत्रुज बंद पडणार अशी कुणकुण लागल्यानंतर मी ही इंत्रुजाची गाणी ध्वनिमुद्रीत करुन ठेवली. जुनी वाद्ये गावात होतीच. या ध्वनिमुद्रणावरुन वाद्यांचा ताल आम्हाला समजला. हळूहळू आता नवीन तरुणही ही वाद्ये वाजविण्यास तरबेज झाले. आपले हे सांस्कृतिक वैभव पुसून जाऊ नये यासाठी फर्नाडिस यांनी नंतर इंत्रुजांच्या गीतांचे हे संकलन ‘गोंयचो मूळ आवाज’ या पुस्तकरुपात छापून एक दस्ताऐवज तयार करुन ठेवला आहे. जॉन व त्यांचे सवंगडी आपली जुनी संस्कृती कायम राहावी यासाठी कला व संस्कृती खात्याच्या सहाय्यातून आंबावली येथे दरवर्षी आदिवासी कला महोत्सवही सादर करतात. ते म्हणतात, प्रत्येक समुहाची स्वत:ची एक संस्कृती असते. त्या त्या समुहाची ती ओळख असते. ही जर ओळखच पुसून गेली तर त्या समुहाची भुमिकडे असलेली नाळ तुटून जाते. ही नाळ कायम रहावी यासाठीच हे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.