राज्यात २०२७ पर्यंत कर्करोग इस्पितळ कार्यरत; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 11:08 IST2026-02-04T11:07:38+5:302026-02-04T11:08:46+5:30
एआय-सक्षम फुफ्फुसाच्या कर्करोग तपासणी तंत्रज्ञानाचा प्रारंभ; आतापर्यंत १ लाख जणांचे स्कॅनिंग पूर्ण.

राज्यात २०२७ पर्यंत कर्करोग इस्पितळ कार्यरत; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: जनतेला अद्यायावत आरोग्य सेवा देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी आरोग्य खाते सक्रियपणे काम करत आहे. आता २०२७ पर्यंत राज्यात कर्करोग इस्पितळ कार्यरत होणार आहे. पंतप्रधान कार्यालय या प्रकल्पावर लक्ष ठेवून असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. राज्यात एआय-सक्षम फुफ्फुसाच्या कर्करोग तपासणी तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रारंभझाला असून या अंतर्गत आतापर्यंत १ लाख जणांचे स्कॅनिंग पूर्ण झाल्याची माहितीही मंत्री राणे यांनी दिली.
येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. एआय तंत्रज्ञानाचा वापर करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. यावेळी राज्य सरकारने क्वेरा या कंपनीसोबत या तंत्रज्ञानाबाबत करार केला आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे आतापर्यंत राज्यात १ लाख जणांचे स्कॅनिंग झाले असून २०२६ च्या अखेरपर्यंत २ लाखांपर्यंत स्कॅनिंग केले जाईल असेही त्यांनी नमूद केले.
मंत्री राणे म्हणाले, की गोव्यातील कर्करोग इस्पितळाच्या बांधकामावर पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) बारकाईने लक्ष ठेवून आहे. हा प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, सध्या बांधकाम सातव्या मजल्यापर्यंत पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत या प्रकल्पाच्या कामाला वेग दिला जाईल. या बांधकामांवर आमचेही लक्ष आहे. हे इस्पितळ टाटा मेमोरियल कर्करोग इस्पितळाच्या धर्तीवर असून तिथे लागणारी उपकरणे ही इस्राईल येथून आणली जातील, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
१ लाख ८ हजार ४७४ जणांचे स्कॅनिंग
एआय-सक्षम फुफ्फुसाच्या कर्करोग तपासणी तंत्रज्ञानाद्वारे राज्यातील १ लाख ८ हजार ४७४ जणांच्या छातीचे तसेच फुफ्फुसाचे स्कॅनिंग केले. यात सुमारे १ हजार ६५० जणांमध्ये नोड्युल्स आढळून आले असून त्यापैकी २० जणांत फुफ्फुसाच्या कर्करोग आढळून आला आहे. त्यांना पुढील उपचारासाठीची शिफारस केली आहे. एआय-सक्षम फुफ्फुसाच्या कर्करोग तपासणी तंत्रज्ञानाद्वारे गोव्यात १७ केंद्रांसह गोमेकॉतही तपासणी केली जात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. पणजी येथे एआय-सक्षम फुफ्फुसाच्या कर्करोग तपासणी तंत्रज्ञानाच्या शुभारंभ कार्यक्रमात मोठी उपस्थिती होती.
गोवा मॉडेल राज्य ठरणार
एआय-सक्षम फुफ्फुसाच्या कर्करोग तपासणी तंत्रज्ञान हे गोव्यासाठी फार महत्त्वाचे आहे. गोव्यातील आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असून सरकार अशा उपक्रमांना नेहमीच पाठिंबा देत आहे. आरोग्य क्षेत्रात एआयचा वापर करण्यात गोवा हे मॉडेल राज्य ठरणार असल्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी नमूद केले.
एआय तंत्रज्ञानामुळे कर्करोगाचे वेळेत निदान व उपचार मिळणे रुग्णांना शक्य होत आहे. एआयमुळे फुफ्फुसाच्या कर्करोग रुग्णांची संख्या कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे डॉक्टरांवरील ताणही कमी होण्यास निश्चितच कमी होईल, तसेच लोकांचा या आजारापासून जीव वाचवण्यासही मदत होईल. - विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री