मंत्रिमंडळ फेरबदलास थोडा वेळ लागेल, गोविंद गावडेंचे मंत्रिपद काढण्याचा निर्णय माझाच: मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 09:52 IST2025-08-15T09:52:16+5:302025-08-15T09:52:36+5:30
एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

मंत्रिमंडळ फेरबदलास थोडा वेळ लागेल, गोविंद गावडेंचे मंत्रिपद काढण्याचा निर्णय माझाच: मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मंत्रिमंडळ बदलास थोडा वेळ लागेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, एक मंत्रिपद सध्या रिकामे आहे ते लवकरात लवकर भरावे हा विचार करून सर्व गोष्टी चालल्या आहेत. मी केंद्रीय नेत्यांशी याबाबतीत बोललेलो आहे. योग्यवेळी योग्य ते होईल.
गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय मीच घेतला. पक्षशिस्त व इतर गोष्टीही महत्त्वाच्या असतात. गोविंद हे माझे चांगले मित्र आहेत. राज्याच्या हिताने काही निर्णय घ्यावे लागतात. गोविंदशी माझी कोणतीही कटुता नाही. माझ्या बाजूने मी बिल्कुल साफ आहे. गोविंद आजही त्यांचे काही काम असले तर मला सांगतात आणि मी ते करतो.' गोविंद यांना मंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय कठीण गेला का? या प्रश्नावर ते बोलत होते.
मंत्रिमंडळ हे बाराजणांच्या क्रिकेट टीमसारखे आहे. ज्याला बॅटिंग करायला दिली तो प्रसंगी सेंच्युरीही मारतो. परंतु बाराव्या खेळाडूला संधी मिळाली नाही म्हणून तो निष्क्रिय असे म्हणता येणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीतच आरक्षण?
एसटींना निवडणुकीत आरक्षण देण्याबाबतची प्रक्रिया वेगाने झाली तर कदाचित २०२७ च्या निवडणुकीतही ते मिळू शकते. २०२७ मध्ये जनगणना होणार आहे. मतदारसंघांची फेररचना २०२७ नंतरच होणार आहे. ही प्रक्रिया जर लवकर झाली तर कदाचित लवकरही आरक्षण मिळू शकते.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'आदिवासींसाठी भाजप सरकारने अनेक गोष्टी केलेल्या आहेत. मी मुख्यमंत्री होण्यापूर्वी वननिवासी हक्क कायद्याखाली एकालाही सनद मिळाली नव्हती. आता २८०० सनदा या लोकांना बहाल केल्या. येत्या १९ डिसेंबर पूर्वी जास्तीत जास्त अर्ज निकालात काढले जातील.'